गूढ आवाजाने बीड जिल्ह्यातील केकाणवाडी गाव हादरले, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

रामदास साबळे
Tuesday, 13 October 2020

बीड जिल्ह्यातील केकाणवाडी गावात मंगळवारी (ता.१३) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास अचानक मोठ्याने दोन-तीन वेळा आवाज होऊन घरावरील पत्रे हादरले.

केज (जि.बीड) : तालुक्यातील केकाणवाडी शिवारातील साठवण सोनवळा तलाव भागात मंगळवारी (ता.१३) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास अचानक मोठ्याने दोन-तीन वेळा आवाज होऊन गावातील घरावरील पत्रे हादरले. या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये बराच वेळ भीतीचे वातावरण पसरले होते. त्यानंतर रात्री पावणे सात वाजता मोठा आवाज झाला. याच सुमारास नायब तहसीलदारांनी गावास भेट देऊन भूगर्भतज्ज्ञांना पाचारण करणार असल्याची माहिती देऊन ग्रामस्थांना सावधानता बाळगण्याचे आवाहन केले.

अनिष्ठ अशा पोतराज प्रथेतून नितीन झाला मुक्त, मेकॅनिक म्हणून करतो नोकरी

तालुक्यातील केकाणवाडी शिवारात मंगळवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास अचानक मोठ्याने दोन-तीन वेळेस मोठे आवाज झाले. यावेळी झालेल्या आवाजाने परिसर हादरल्याने ग्रामस्थ घरांमधून रस्त्यावर आले. त्यानंतर पावणेसात वाजण्याच्या सुमारास आणखी आवाज झाला. याच सुमारास नायब तहसीलदार सचिन देशपांडे व महसूल सहायक मन्मथ पटणे यांनी गावास भेट देऊन पाहणी करून ग्रामस्थांशी संवाद साधला. ते जाताच पावणेआठ वाजता मोठा आवाज झाला. काही अंतराच्या फरकाने होणाऱ्या आवाजाने ग्रामस्थांत भीतीचे वातावरण पसरले आहे.

 

अचानक होणाऱ्या आवाजाची माहिती वरिष्ठांना देऊन हे आवाज होण्याचे कारण शोधण्यासाठी भूगर्भतज्ज्ञांना पाचारण करण्यात येईल. ग्रामस्थांनी घाबरून न जाता सावधानता बाळगावी.
- सचिन देशपांडे, नायब तहसीलदार, केज

अचानक झाल्याने घरातील सामान व पत्रे हादरले होते. त्यामुळे गावकरी घाबरून गेले होते. हे आवाज होण्याचे कारण प्रशासनाने शोधून काढण्याची गरज आहे.
-बबिता केकाण, सरपंच, केकाणवाडी

 

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kekanwadi Shake Due To Mistrious Sounds Beed News