अनिष्ठ अशा पोतराज प्रथेतून नितीन झाला मुक्त, मेकॅनिक म्हणून करतो नोकरी

Nitin Kambale
Nitin Kambale

उमरगा (जि.उस्मानाबाद) : अंधश्रद्धेच्या जोखडातून मुक्त झालेला एक शाळकरी मुलगा उच्च शिक्षण घेऊन सन्मानाने जीवन जगत आहे. तब्बल १५ ते १६ वर्षांपूर्वी तालुक्यातील व्हंताळ येथील नितीनला त्याच्या आई, वडिलाने गैरसमजुतीने पोतराज बनविले होते. मात्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती व समविचारी संघटनेच्या लोकांनी त्याला तेराव्या वर्षी पोतराज प्रथेतून मुक्त केले. त्यांनतर तो प्रतिकुल परिस्थितीत शिक्षण घेऊन आता नितीन नवी मुंबई महानगरपालिकेच्या परिवहन विभागात मेकॅनिक पदावर कार्यरत आहे.


व्हंताळ येथील कांबळे कुटुंबीय गरिबी परिस्थिती होते. शिक्षणाचा गंध नव्हता. नितीनचे आजोबा पोतराज होते. मात्र वडिल केरनाथ यांनी हा वारसा न चालविता मजुरीचे काम करू लागले. मात्र पुढे चालून पोतराज नितीनच्या नशीबी आले. नितीनला व्हंताळ येथे सातवीपर्यत शिक्षण झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी उमरगा येथे यावे लागले. उमरगा येथील बहुजन हिताय विद्यार्थी वसतिगृहात तत्कालीन धम्मचारी कमलबोधी यांच्या मदतीने नितीनला वसतिगृहात प्रवेश मिळाला. दरम्यान अंधश्रद्धा निर्मूलनचे जिल्हा कार्याध्यक्षपदी असलेले प्रा. किरण सगर यांच्या नजरेतून नितीन सुटू शकला नाही.

त्यांनी व्हंताळ येथे नितीनच्या आई, वडिलांच्या भेटी घेतल्या. तसेच तुरोरी येथील त्याचे मामा धनराज कांबळे यांचे समुपदेशन केले. त्यानंतर त्यांनी नितीनचे मतपरिवर्तन केले. त्यांच्यात झालेल्या परिवर्तनामुळे यांच्या नितीन यांची पोतराज प्रथेतून कायमची सुटका करण्यात आले. त्या वेळी नितीन हा आठव्या इयत्तेत शिकत होता. समारंभपूर्वक कार्यक्रम घेऊन त्याची पोतराज प्रथेतून मुक्ती होण्यासाठी प्रा. सगर यांनी काम केले. नितीन हळूहळू मुलात रमू लागला. त्याच्या डोक्यावर असलेल्या केसांमुळे तो मुलात मिसळत नसे.  बालवयात त्याला पोतराज चिकटल्याने तो तसाच एकलकोंडा राहू लागला.

त्यातच त्याचे दहावीचे शिक्षण पूर्ण झाले. त्यानंतर त्याने उमरगा येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) प्रवेश घेतला. पुढे शिक्षण घेण्याची ओढ त्याला स्वस्त बसू देत नव्हती. त्याने महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी प्रवेश मिळविला. मात्र घरची गरीब परिस्थितीमुळे त्याला रोजीरोटीसाठी गाव सोडावे लागले. पुणे, मुबंई या ठिकाणी कामाच्या निमित्ताने तो शहरात दाखल झाला. अंगी असलेली गुणवत्ता आणि लीनता जवळ असल्याने त्याने मुबंई येथे कंपनीत काम मिळविले, हे काम करताना नवी मुंबई महानगरपालिकेच्या परिवहन विभागात मेकॅनिक म्हणून नोकरीला सुरवात केली आहे. रविवारी (ता.११) त्याने आपल्या नव्या जीवनाची सुरवात केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घालून दिलेल्या शिकवणुकीचा त्याने अंगीकार केला आहे आणि बौद्ध पध्दतीने तो विवाहबद्ध झाला. आष्टा (जहागिर ) येथील सामाजिक कार्यकर्ते कमलाकर सूर्यवंशी यांची सुकन्या आरती यांच्यासोबत अंत्यत साध्या पद्धतीने तो गृहस्थाश्रमी जीवनात पदार्पण केले आहे.


अंनिसच्या माध्यमातून काम करीत असताना उमरगा परिसरात तीन पोतराज मुलांना त्यातून त्याची सुटका करून दिली. आज ते सन्मानाने जीवन जगत आहेत. व्हंताळ येथील नितीन, एकोंडी येथील योगेश व कानेगाव येथील एका मुलांची यातून सुटका केली आहे. जिल्हाभरातून वीस पोतराज मुक्त मुले केले असून परिवर्तनवादी चळवळीत काम करणाऱ्या व फुले, शाहू व आंबेडकर यांच्या विचारांवर श्रद्धा असणाऱ्या परिवर्तन वादी मंडळींनी या कामाला सहकार्य करावे.
- प्रा. किरण सगर, अंधश्रद्धा निर्मूलन समिती


अंधश्रद्धा ही जीवनाला कलाटणी देणारी बाब नाही. तत्कालिन स्थितीत मला पोतराज मुक्त करण्यात आले आणि माझ्या जीवनाला नवी दिशा मिळाली. गरिबीतून शिक्षण घेऊन उदरनिर्वाहासाठी मुंबई गाठली. कालांतराने महानगरपालिकेच्या परिवहन विभागात नोकरी मिळाली. हे सर्व शिक्षणातून साध्य झाले.
- नितीन कांबळे

संपादन - गणेश पिटेकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com