esakal | इम्तियाज यांच्या शेजारी बसण्यास खैरेंनी दिला नकार, रंगले मानापमान नाट्य
sakal

बोलून बातमी शोधा

चंद्रकांत खैरे आणि इम्तियाज जलील

खासदार इम्तियाज जलील यांच्या मांडीला मांडी लावून बसण्यास माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी नकार दिला आणि "क्रेडाई'च्या पदग्रहण सोहळ्यात चांगलेच मानापमान नाट्य रंगले. अखेर आमदार अंबादास दानवे यांना "त्या' खुर्चीवर सरकावून खैरे यांनी दूर बसणे पसंत केले. 

इम्तियाज यांच्या शेजारी बसण्यास खैरेंनी दिला नकार, रंगले मानापमान नाट्य

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद - खासदार इम्तियाज जलील यांच्या मांडीला मांडी लावून बसण्यास माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी नकार दिला आणि "क्रेडाई'च्या पदग्रहण सोहळ्यात चांगलेच मानापमान नाट्य रंगले. अखेर आमदार अंबादास दानवे यांना "त्या' खुर्चीवर सरकावून खैरे यांनी दूर बसणे पसंत केले. 

'क्रेडाई'च्या नूतन कार्यकारिणीच्या पदग्रहण समारंभात रविवारी (ता. एक) मंचावरील खुर्च्या पदश्रेणीनुसार मान्यवरांच्या नावानिशी राखीव ठेवण्यात आल्या होत्या. काहीसे उशिरा आलेल्या माजी खासदार खैरे यांची खुर्ची नेमकी विद्यमान खासदार इम्तियाज जलील यांच्या शेजारीच मांडलेली होती. यावर चिडचिड करीत त्यांनी आमदार अंबादास दानवे यांना त्या खुर्चीवर सरकण्यास सांगितले आणि आपण दानवे यांच्या खुर्चीवर बसले. हा प्रकार पाहून उपस्थितांमध्येही खसखस पिकली होती. यावर कडी म्हणजे, आमदार संजय शिरसाट यांनी आपल्या भाषणात, "इम्तियाज जलील यांनी सर्वांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविल्याचा' चेंडू भिरकाविला. त्याचाच झेल घेत इम्तियाज यांनीही भाषणात "काही लोकांना मी खासदार झालो, यावर विश्‍वासच बसलेला नाही' असे वक्तव्य केले. यानंतर खैरे बोलायला उभे राहिले. 

"आल्यापासून पाहतोय, माझा उल्लेख सारखा माजी खासदार-माजी खासदार म्हणून केला जातोय. मी खासदार होतो हे खरे आहे; पण सध्याही मी शिवसेनेचा नेता आहे. लोक अजूनही आपली कामे घेऊन माझ्या कार्यालयात येतात,'' अशा शब्दांत चंद्रकांत खैरे यांनी संताप व्यक्त केला. आपली थट्टा सहन न झाल्यामुळेच चंद्रकांत खैरे यांनी मनातली खदखद बाहेर काढल्याची चर्चा उपस्थितांत रंगली होती. 

तुम्ही साथ दिली नाही म्हणून... 
"मी पाच वर्षे नगरविकास खात्याचा मंत्री होतो, तेव्हा 'क्रेडाई'ला खूप मदत केली. शहर विकासात हातभार लावणाऱ्या बिल्डरांना शिवसेनेने कधी खंडणी मागितली नाही. त्रास दिला नाही; पण तुम्ही मला साथ दिली नाही म्हणून "हे असे' बघावे लागले,'' अशा शब्दांत खैरे यांनी नाराजी व्यक्त केली. 

माझ्या मित्राला मंत्री करा : इम्तियाज जलील 
राज्यमंत्री अतुल सावे आणि योगेश सागर यांना पुढील मंत्रिमंडळ विस्तारात कॅबिनेटमंत्री करा, अशी गळ नवनिर्वाचित अध्यक्ष जबिंदा यांनी विधानसभा अध्यक्षांना घातली. हाच धागा पकडून खासदार इम्तियाज यांनी, शिवसेनेतल्या माझ्या मित्रालाही मंत्रिपद मिळावे, अशी विनंती आपण 'मातोश्री'वर जाऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे करणार असल्याचे म्हटले. यावेळी खैरे यांनी त्यांच्याकडे टाकलेला जळजळीत कटाक्ष उपस्थितांच्या नजरेतून सुटला नाही. 

loading image
go to top