खेळणा मध्यम प्रकल्प शंभर टक्के भरला

अमाेल ताेंगल
मंगळवार, 20 ऑगस्ट 2019

सिल्लोड शहरासह दहा ते बारा गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या पालोद (ता. सिल्लोड) येथील खेळणा मध्यम सिंचन प्रकल्प शंभर टक्के पाणीसाठा झाल्याने सोमवारी (ता. 19) सांडव्यावरून पाणी वाहण्यास सुरवात झाली. त्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

रहिमाबाद, ता. 19 (जि.औरंगाबाद) : सिल्लोड शहरासह दहा ते बारा गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या पालोद (ता. सिल्लोड) येथील खेळणा मध्यम सिंचन प्रकल्प शंभर टक्के पाणीसाठा झाल्याने सोमवारी (ता. 19) सांडव्यावरून पाणी वाहण्यास सुरवात झाली. त्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

रविवारी (ता. 18) रात्री केळगाव अंभई परिसरात दोन तास जोरदार पाऊस झाल्याने खेळणा नदीला पाणी येऊन खेळणा मध्यम सिंचन प्रकल्प शंभर टक्के पूर्ण भरले आहे. यापूर्वी 18 सप्टेंबर 2015 साली हे धरण पूर्ण भरले होते. तब्बल चार वर्षांनंतर या प्रकल्पाच्या सांडव्यावरून पाणी बाहेर पडले आहे. गतवर्षी हे धरण कोरडे पडल्याने सिल्लोड शहरासह पालोद, अन्वी,मंगरुळ, चिंचपूर, चांदापूर, मांडणा, हट्टी, बहुली, उंडणगाव, पानवडोद, गोळेगाव, सारोळा, डोंगरगाव आदी गावांत भीषण पाणीटंचाई निर्माण झाली होती.

सिल्लोड नगरपालिकेच्या वतीने प्रकल्पात पाण्यासाठी चर खोदून काही अंशी पाणीपुरवठा केला होता. मात्र, प्रत्यक्षात जमिनीतील पाणीपातळी गतवर्षी मोठ्या प्रमाणात खालावली होती. मात्र, यावर्षी तालुक्‍यातील काही भागांत पावसाचे प्रमाण चांगले असल्याने खेळणा मध्यम प्रकल्प शंभर टक्के भरल्यामुळे सध्याच्या घडीला या गावांचा पाणीप्रश्न मिटला आहे. मात्र, रहिमाबाद परिसरात अद्यापही दमदार पाऊस न झाल्याने रहिमाबाद येथील लघुसिंचन प्रकल्पात अठ्ठावीस टक्के पाणीसाठा झाला आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: khelna medium project filled