श्रमिक रेल्वेने १ हजार १८३ मजूर यूपीला रवाना : पहा Video

महेश गायकवाड
Tuesday, 12 May 2020

जालना येथून १ हजार १८३ मजुरांना घेऊन श्रमिक रेल्वे उत्तर प्रदेशकडे रवाना झाली. दरम्यान, बिहारचे २ हजार ७०० मजूर जालन्यामध्ये अडकलेले असून त्यांच्यासाठीसुद्धा दोन रेल्वेचे नियोजन करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी दिली. 

जालना - लॉकडाउनमध्ये अडकलेल्या उत्तर प्रदेशमधील उन्नाव येथील १ हजार २०० मजुरांना रविवारी (ता. १०) विशेष श्रमिक रेल्वेने पाठविण्यात आल्यानंतर मंगळवारी (ता. १२) सायंकाळी सात वाजेच्या सुमारास पुन्हा दुसरी श्रमिक रेल्वे १ हजार १८३ मजुरांना घेऊन उत्तर प्रदेशकडे रवाना झाली. दरम्यान, बिहारचे २ हजार ७०० मजूर जालन्यामध्ये अडकलेले असून त्यांच्यासाठीसुद्धा दोन रेल्वेचे नियोजन करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी दिली. 

लॉकडाउनमुळे अडकलेल्यांना त्यांच्या गावी जाण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत अत्यंत शिस्तबद्ध रीतीने नियोजन करण्यात येत आहे. या कामामध्ये जिल्ह्यातील अनेक स्वयंसेवी संस्था प्रशासनाला मदत करीत आहेत.

हेही वाचा : जालन्याला यायचंय, या लिंकवर करा अर्ज 

मंगळवारी रेल्वेगाडीत १ हजार ४६४ मजुरांचे नियोजन करण्यात आले होते; परंतु प्रवासासाठी आलेल्या १ हजार १८३ एवढ्या मजुरांना घेऊन रेल्वे उत्तर प्रदेशकडे रवाना झाली आहे. 

राज्य शासनामार्फत तिकिटाचा खर्च 

बिहार राज्यातील २ हजार ७०० मजूर जालना जिल्ह्यामध्ये अडकून पडले आहेत. या मजुरांना त्यांच्या गावी पाठविण्यासाठी प्रशासनामार्फत दोन श्रमिक रेल्वेचे नियोजन करण्यात येत आहे. बिहार राज्य सरकारकडून परवानगी मिळताच मजुरांना श्रमिक रेल्वेच्या माध्यमातून त्यांच्या गावी पाठविण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकारी बिनवडे यांनी सांगितले.  उत्तर प्रदेशमध्ये पाठविण्यात आलेल्या मजुरांकडून रेल्वेच्या तिकीट भाड्यापोटी प्रत्येकी ५९५ रुपये घेण्यात आले होते; परंतु या मजुरांच्या तिकिटाचा खर्च राज्य शासनामार्फत करण्याचा निर्णय घेतल्याने मंगळवारी उत्तर प्रदेशकडे जाणाऱ्या; तसेच बिहार राज्यात जाणाऱ्या मजुरांना मोफत प्रवासाची सोय उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही श्री. बिनवडे यांनी यावेळी सांगितले. 

जिल्‍हा प्रशासनाचे चोख नियोजन 

विशेष श्रमिक रेल्‍वेसाठी जिल्‍हा प्रशासनाने अत्यंत चोख असे नियोजन करीत या श्रमिकांना उत्तर प्रदेशमध्ये येण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारकडून लेखी परवानगी प्राप्त करून घेत कामगारांच्या प्रवासाची तिकिटे आरक्षित करण्यात आली. शासनाच्या निर्णयानुसार या सर्व मजुरांच्या प्रवासासाठी लागणाऱ्या तिकिटाचे पैसे प्रशासनामार्फत अदा करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये अडकून पडलेल्या या मजुरांना जालना येथे आणण्यासाठी प्रशासनामार्फत विशेष बसची सोयही करण्यात आली होती. 

रेल्वेचे पूर्णपणे ‍निर्जंतुकीकरण 

प्रवास करणाऱ्या मजुरांची सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून रेल्वेस्थानकावर आरोग्य तपासणीही करण्यात आली. प्रवाशांसाठी चालविण्यात येणाऱ्या या रेल्वेचे पूर्णपणे ‍निर्जंतुकीकरण करण्यात येऊन प्रवास करणाऱ्या प्रत्येकाने चेहऱ्यावर मास्क किंवा रुमाल घातला असल्याची खात्री करून घेण्यात आली. रेल्वेमधून पाठविण्यात येणाऱ्या प्रवाशांना शारीरिक अंतराचे पालन करणे बंधनकारक करण्यात आले होते; तसेच प्रवाशांच्या जेवणाची आणि पिण्याच्या पाण्याची सोय करून त्यांच्यासोबत खाद्यपदार्थही देण्यात आले. यावेळी तहसीलदार श्रीकांत भुजबळ, बालकामगार प्रकल्प अधिकारी मनोज देशमुख, पोलिस उपअधीक्षक सुधीर खिरडकर, पोलिस निरीक्षक श्री. महाजन यांच्यासह महसूल, रेल्वे, पोलिस, आरोग्य विभागातील अधिकारी उपस्थित होते. 

दो महिनों के बाद गाव जा रहा हूँ... 

साहब मै दो महिनों के बाद अपने गाँव जा रहा हूँ. बहोत अच्छा लग रहा है. महाराष्ट्र सरकारने हमारी बहोत मदत की. मै मार्च में बीड मे आया था. और दोन दिन बाद लॉकडाउन हो गया. इसलीये सायकल से उत्तर प्रदेश जा रहा था. लेकिन जालना के अफसरोंने हमारी मदत की. हमे गुरुकुल स्कूल मे ले गये. हमे ट्रेन का टिकट दिया. खाना, पाणी और मास्क भी दिया. मै यहाँ के अफसरो को बहोत धन्यवाद देता हूँ. अशा शब्दांत उत्तर प्रदेशमधील मनोज कुमार यांनी जाताना आपल्या भावना व्यक्त केल्या. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Laborers departure to Uttar Pradesh by train