जमीन खरेदी - विक्री करताय? आधी हे वाचा.. अन्‌ टाळा आपली फसवणूक

​ ​​​सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 डिसेंबर 2019

  • बनावट कागदपत्रांद्वारे शेतजमीन विकणारी टोळी अटकेत
  • मूळ मालक बनून विकायचे एकाची शेती दुसऱ्याला 
  • वेळीच घ्या योग्य ती काळजी 
     

औरंगाबाद : मुळ मालक असल्याचे भासवून सात जणांनी संगनमत करून मौजे फत्तेपूर शिवारातील शेत जमीन परस्पर विकली. या टोळीतील चौघांना सातारा पोलिसांनी रविवारी पहाटे अटक केली. 

 

बीड येथील मसरतनगर येथे राहणारे डॉ. राजू पंढरीनाथ उन्हाळे यांच्या मालकीची शेत जमीन मौजे फत्तेपूर शिवारातील गट क्रमांक 21 आणि 22 मध्ये आहे. सलीम खान महेबुब खानने शेत जमीन आपली असल्याचे भासवून ती परस्पर विकण्याचा कट रचला. त्यासाठी त्याने मुळ मालक डॉ. राजू पंढरीनाथ उन्हाळे (रा. संर्घषनगर, मुकूंदवाडी) असे नाव धारण करून त्या नावाची कागदपत्रे तयार केली. त्यानंतर प्लाटींग एजंट काझी सलाऊद्दीन ऊर्फ आमेर काझी इर्शाद्दोद्दीन (29) रा. रोशनगेट, आणि आयुब आमीन पठाण या दोघांनी नगर येथील अक्षय राजेंद्र लुणावत यांना शेत जमीनीचे बनावट मालक सलीम खानची भेट करून दिली. 

हेही पहा - Video : जुळ्या मुला-मुलींमध्ये का असतो एकसारखेपणा?

त्या दोघांमध्ये शेतजमीनीचा व्यवहार झाला त्यानंतर सलीम खान ऊर्फ डॉ. राजू उन्हाळे याने अक्षय लुणावत यांना बीडबायपास रस्त्यावरील दुय्यम निबंधक कार्यालयात 14 मार्च ते 22 जून 2019 दरम्यान खरेदीखत करून देत त्याच्यावर सह्या केल्या. बीडचे डॉ. उन्हाळे यांना शेत जमीन विकल्याचे समजल्यावर त्यांनी दुय्यम निबंधक कार्यालयात येऊन प्रत्यक्ष पाहणी केली असता आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. 

हे चौघे अटकेत 
डॉ. राजू उन्हाळे यांनी सातारा पोलीस ठाण्यात धाव घेऊन बनावट मालक शेख सलीम याच्यासह सात जणाविरोधात तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून सलीम खान महेबुब खान ऊर्फ राजू पंढरीनाथ उन्हाळे, शेख फरीद्दोद्दीन हफीज ऊर्फ अफसर शब्बीर पठाण रा. जूना बाजार, काझी सलाऊद्दीन ऊर्फ आमेर काझी रा. रोशनगेट आणि आयुब आमीन पठाण रा. मोतीवाला कॉलनी या चौघांना अटक केली. 

हेही वाचा ​- अहो आश्‍चर्यम्‌...आरटीओंनी जप्त केलेल्या वाहनांत दलालांची "दुकान'दारी...

बुधवारपर्यंत पोलिस कोठडी 
चौघाही संशयितांना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. एस. कांबळे यांच्या समोर हजर केले असता सरकारी वकील एस. आर. ढोकरट यांनी त्या चौघांनी बनावट मतदान कार्ड, आधारकार्डसह अन्य कागदपत्र कुठे तयार केली याची चौकशी करावयाची आहे. अन्य साथीदारांना अटक करावयाची असल्यामुळे पोलीस कोठडी देण्यात यावी अशी मागणी केली. न्यायालयाने चौघांना बुधवारपर्यंत (ता.4) पोलीस कोठडी सुनावली.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Before Land Buying-Selling Read This