पतीने पेटवून दिलेल्या महिलेचा अखेर मृत्‍यू

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 फेब्रुवारी 2020

आडगाव मुटकुळे येथील संगीता हनवते (वय २५) या विवाहितेला काही दिवसांपासून पती आणि सासू त्रास देत होते. त्‍यातच रविवारी (ता. नऊ) सकाळी सातच्या सुमारास पती शंकर हनवते याने तिच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून दिले. यात ती महिला ७८ टक्के भाजली होती. बुधवारी या विवाहितेचा मृत्यू झाला.

कनेरगाव नाका (जि. हिंगोली): आडगाव मुटकुळे (ता. हिंगोली) येथे पतीने पेटवून दिलेल्या विवाहितेचा उपचारादरम्यान अकोला येथे बुधवारी (ता.१२) मृत्यू झाला. मृत्यूनंतर विवाहितेचा मृतदेह गुरुवारी (ता. १३) आडगाव येथे आणण्यात आला. मात्र, जोपर्यंत पती येत नाही, तोपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्‍कार करणार नसल्याचा पवित्रा तिच्या नातेवाइकांनी घेतल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. ग्रामस्‍थ व पोलिसांच्या मदतीने यावर तोडगा काढल्यानंतर विवाहितेच्या मृतदेहावर सायंकाळी अंत्यसंस्‍कार करण्यात आले.

आडगाव मुटकुळे येथील संगीता हनवते (वय २५) या विवाहितेला काही दिवसांपासून पती आणि सासू त्रास देत होते. त्‍यातच रविवारी (ता. नऊ) सकाळी सातच्या सुमारास पती शंकर हनवते याने तिच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून दिले. यात ती महिला ७८ टक्के भाजली. या प्रकरणी संगीता यांच्या जबाबावरून हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात सासू आणि पतीविरुद्ध गुन्हा झाला आहे. दरम्‍यान, संगीता हनवते या विवाहितेला अकोला येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. येथे उपचार सुरू असताना बुधवारी सायंकाळी तिचा मृत्‍यू झाला. 

हेही वाचाफिरत्या चहा दुकानाने साधली ‘प्रगती’

अंत्यसंस्‍कार करण्यास नातेवाइकांचा नकार

त्‍यानंतर आडगाव येथे गुरुवारी (ता. १३) तिचा मृतदेह आणण्यात आला. मात्र, तिचा पती फरार असल्याने तो आल्याशिवाय अंत्यसंस्‍कार करण्यास तिच्या नातेवाइकांनी नकार दिल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. अन्यथा तिच्या घरासमोरच अंत्यसंस्‍कार करण्याचा निर्णय घेण्यात आला. या वेळी अंत्यसंस्कारासाठी लाकडेदेखील जमा करणे सुरू केले होते. या घटनेची माहिती पोलिसांना समजल्यानंतर हिंगोली ग्रामीणचे पोलिस घटनास्‍थळी पोचले.

पोलिसांच्या मदतीने वाद मिटविला

 या वेळी वातावरण पाहून गावातील तंटामुक्‍तीचे अध्यक्ष पांडुरंग मुटकुळे, माजी सरपंच सदाशिव मुटकुळे, गजानन मुटकुळे, अरुण लांभाडे, बबन इंगोले आदींनी पुढाकार घेत पोलिसांच्या मदतीने हा वाद मिटविला. त्यानंतर संगीता हनवते यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्‍कार करण्यात आले. संगीता यांना एक मुलगा व एक मुलगी आहे.

येथे क्लिक करारेऊलगावात उभारली बौद्ध गया विहाराची प्रतिकृती

गळफास घेऊन महिलेची आत्‍महत्या

सेनगाव: तालुक्‍यातील साखरा येथील एका महिलेने गळफास घेऊन आत्‍महत्या केल्याची घटना गुरुवारी (ता. १३) घडली. या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेनगाव तालुक्‍यातील साखरा येथील सरस्‍वती गजानन आंबटकर (वय २८) दुपारी बाराच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. या बाबत निळकंठ भादलकर यांच्या फिर्यादीवरून सेनगाव पोलिस ठाण्यात आमस्‍मिक मृत्‍यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलिस करीत आहेत.

पोलिस कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्‍महत्या

हिंगोली: तालुक्‍यातील इसापूर येथील केशव वानखेडे (वय ३५) या पोलिस कर्मचाऱ्याने लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्‍महत्या केल्याची घटना गुरुवारी (ता. १३) सकाळी अकरा वाजता उघडकीस आली. इसापूर येथील केशव वानखेडे हे पनवेल भागातील पोलिस ठाण्यात कार्यरत होते. दोन दिवसांपूर्वी ते इसापूर या मूळ गावी पत्नी व मुलांना घेऊन आले होते. गुरुवारी सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास ते शेताकडे फेरफटका मारायला जातो असे सांगून बाहेर पडले. बराच वेळ घरी आले नसल्याने त्यांचा शेतात शोध घेतला असता शेतातील लिंबाच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्‍महत्या केल्याचे उघडकीस आले. त्यांच्या आत्‍महत्यचे कारण समजू शकले नाही. घटनास्‍थळी बासंबा पोलिसांनी भेट दिली असून या बाबत नोंद घेण्याची प्रक्रिया सायंकाळपर्यंत सुरू होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The last death of a woman who was burnt by her husband