
Anti Corruption Bureau : पंधरा हजारांची लाच घेताना कृषी अधिकाऱ्याला अटक
लातूर - पंधरा हजार रुपयांची लाच घेताना येथील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातील जिल्हा गुणनियंत्रक निरीक्षक कृषी अधिकारी विलास किसन मिस्कीन (वय ५०) यांना येथील लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पथकाने गुरुवारी अटक केली आहे.
तक्रारदाराचे कृषी खते, औषधे व बियाणे विक्री दुकान आहे. तेथे वेगवेगळ्या कंपन्यांचे खताचे टॉनिक उत्पादन विक्री करू देण्यासाठी व त्यांच्या दुकानावर कारवाई न करण्यासाठी कृषी अधिकारी विलास मिस्कीन यांनी २५ हजारांची लाच मागितली होती. यासंदर्भात तक्रारदाराने येथील लाचलुचपत प्रतिबंध विभागाशी संपर्क साधून १९ जुलैला तक्रार दिली होती.
विभागाने पडताळणीही केली. तडजोडीअंती पंधरा हजारांची मागणी केल्याचे स्पष्ट झाले. पथकाने गुरुवारी तक्रारदाराच्या दुकानात सापळा लावला. त्यावेळी तक्रारदाराकडून पंधरा हजार स्वीकारताना मिस्कीन यांना पथकाने पकडले. विभागाचे पोलिस निरीक्षक अन्वर मुजावर, भास्कर पुल्ली आदींना या कारवाईसाठी पुढाकार घेतला.
‘लाचेची मागणी झाल्यास संपर्क साधा’
जिल्ह्यातील कोणत्याही शासकीय अधिकारी व कर्मचारी किंवा त्यांच्या वतीने खासगी व्यक्तीने कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी नियमानुसार शुल्काशिवाय लाचेची मागणी केल्यास संपर्क साधण्याचे आवाहन लाचलुचपत प्रतिबंध विभागाने केले आहे.
Web Title: Latur 15 Thousand Bribe Agriculture Officer Arrested Anti Corruption Bureau
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..