लातुरात वर्षभरात 169 नागरिकांचा अपघाती मृत्यू

सुशांत सांगवे
मंगळवार, 4 डिसेंबर 2018

सावधान, पुढे धोका आहे, अशा नियमांचे फलक रस्त्यांवर ठिकठिकाणी असतानाही बेदरकारपणे वाहन चालवून झालेल्या अपघातांमुळे वर्षभरात तब्बल169 नागरिकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.

लातूर : सावधान, पुढे धोका आहे, अशा नियमांचे फलक रस्त्यांवर ठिकठिकाणी असतानाही बेदरकारपणे वाहन चालवून झालेल्या अपघातांमुळे वर्षभरात तब्बल169 नागरिकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. अपघाताचे प्रमाण मागील वर्षाच्या तुलनेने 8 टक्क्यांनी वाढले आहे. त्यामुळे वाहनचालकांनी अधिक काळजीने वाहन चालवण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

लातूर शहरात आणि जिल्ह्यात अकरा ब्लॅक स्पॉट (अपघातप्रवण क्षेत्र) असले तरी वेगवेगळ्या भागात सातत्याने अपघात होत असतात. भरधाव वेगाने वाहन चालविल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे पोलिसांना ब्लॅक स्पॉटबरोबरच सातत्याने होत असलेल्या अपघातांच्या ठिकाणीही लक्ष द्यावे लागत आहे. मागील वर्षी शहर आणि जिल्ह्यात 434 अपघात झाले होते. त्यात यंदा आठ टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे अपघातांची घटना 467 पर्यंत पोचली आहे.

वेगवेगळ्या कारणांमुळे अपघातात जीव गमवावा लागल्याच्या घटनाही जिल्ह्यात सातत्याने घडत आहेत. बेदरकारपणे वाहन चालविल्यामुळे मागील वर्षी 174 जणांचा मृत्यू झाला होता. चालू वर्षी आत्तापर्यंत 169 जणांचा मृत्यू झाला आहे. वाहनचालकांनी योग्य ती काळजी घेतली नाही तर यंदाची अपघातातील एकूण मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या वाढू शकते.

अपघातांचे प्रमाण जसे वाढले आहे, तसेच अपघातात जखमी होणाऱ्यांचेही प्रमाण वाढले आहे. मागील वर्षी 279 वाहनचालक अपघातामुळे जखमी झाले होते. तर चालू वर्षी अपघातामुळे 292 वाहनचालक गंभीर जखमी झाले आहेत, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी दिली. 

अपघाताची प्रमुख कारणे

- भरधाव वेगाने वाहन चालवणे
- वाहन चालवताना सीटबेल्ट न लावणे
- मोबाईलवर बोलत वाहन चालवणे
- चालकाची पुरेशी झोप न होणे
- मद्यपान करून वाहन चालवणे

Web Title: In Latur 169 Peoples Death in Accident