esakal | लातुरात ८१ म्युकरमायकॉसिस रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया
sakal

बोलून बातमी शोधा

Latur

लातुरात ८१ म्युकरमायकॉसिस रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

लातूर: येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या रुग्णालयामध्ये म्युकरमायकॉसिस (mucormycosis) या आजारांच्या एकूण ४६२ रुग्णांची आजपर्यंत तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये कान नाक घसा विभागामध्ये एकूण ४४४ रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. आत्तापर्यंत तपासणी करण्यात आलेल्या रुग्णांपैकी ८१ रुग्णांवर यशस्वीपणे शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती संस्थेचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांनी दिली. या शस्त्रक्रिया खासगी रुग्णालयात झाल्या असत्या तर सरासरी चार लाखांचा खर्च गृहित धरला तर या रुग्णांचे किमान सव्वा तीन कोटी रुपयांपेक्षा जास्त पैसे वाचले आहेत.

कोरोना झाल्यानंतर रुग्णांना वेगवेगळ्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. त्यात म्युकरमायकोसिस या गंभीर आजाराचा अनेक रुग्णांना त्रास सहन करावा लागत आहे. येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत यावर यशस्वीपणे उपचार केले जात आहेत. तज्ज्ञ डॉक्टरांची टीम हे उपचार करीत आहे. यातूनच आतापर्यंत ८१ जणांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. यात एका एका रुग्णावर वेगवेगळ्या दोन तीन शस्त्रक्रिया करण्यात आलेल्या आहेत. आजपर्यंत ५५ रुग्णांवर नाकाच्या श्वास घेण्याच्या ठिकाणच्या हवेच्या पोकळ्या काढून टाकण्याची शस्त्रक्रिया करण्यात आली; तसेच ४४ रुग्णांवर टाळूचा जबडा काढण्याची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. दोन रुग्णांवर डोळ्यांच्या खालील हाडाची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे, अशी माहिती डॉ. देशमुख यांनी दिली.

हेही वाचा: लॉकडाउनमध्ये Dating app चा वापर वाढला, व्हिडीओ कॉलही वाढले

आजपर्यंत १८ रुग्णांना डोळ्यांच्या पाठीमागे ॲम्फोथेरेसिन बी हे इंजेक्शन देऊन रुग्णांच्या डोळ्यांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत. सहा रुग्णांमध्ये बुरशी बाधित डोळा काढून टाकण्यात आला आहे. म्युकरमायकॉसिस या आजारासाठी आतापर्यंत १ हजार ३०६ इंजेक्शनचा वापर करण्यात आला. सध्या १६० इंजेक्शन या रुग्णालयामध्ये उपलब्ध आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. या संस्थेत म्युकरमायकोसिसचा उपचार सुरू असताना १२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नऊ रुग्णांचा मृत्यू हा पोस्ट कोविडच्या गुंतागुंतीच्या आजारामुळे झाला आहे. ३ रुग्णांचा मेंदूमध्ये बुरशीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे मृत्यू झाल्याची माहिती डॉ. देशमुख यांनी दिली.

आकडेवारी-

-म्युकरमायकोसिसच्या एकूण शस्त्रक्रिया : ८१
-उपचार सुरू असताना मृत्यू : १२
-मेंदूमध्ये बुरशीचा प्रादूर्भाव झाल्याने मृत्यू : ३
-नाकातील हवेच्या पोकळ्या काढून टाकण्याच्या शस्त्रक्रिया : ५५
-टाळूचा जबडा काढण्याच्या शस्त्रक्रिया : ४४
-बुरशी बाधित डोळा काढून टाकण्याची शस्त्रक्रिया : सहा

हेही वाचा: PHOTOS: मेस्सी, छेत्री की रोनाल्डो? पाहा सर्वाधिक गोलस्कोरर

म्युकरमायकोसिस किंवा काळी बुरशीचा संसर्ग सामान्यत: नाकातून सुरू होतो. तो हळूहळू जबडा, डोळा व मेंदूपर्यंत पसरतो. कोविड झालेल्या रुग्णांमध्ये केवळ काही विशिष्ट परिस्थितीत म्युकरमायकोसिस होण्याचा धोका असतो. त्यामध्ये अनियंत्रित मधुमेह, स्टेरॉईडमुळे प्रतिकारशक्ती कमकुवत होणे, दीर्घकाळ अतिदक्षता विभागात ॲडमिट राहणे, अवयव प्रत्यारोपण झाल्यास किंवा कर्करोग झाल्यास बुरशीचा प्रादूर्भाव वाढतो. शस्त्रक्रियेद्वारे बुरशीची लागण झालेला भाग काढून टाकण्यात येतो. साधारणत: १५ दिवसानंतर औषधोपोचराने रुग्ण बरा होतो. पण, वेळेत उपचार घेणे गरजेचे आहे.
-डॉ. सुधीर देशमुख, अधिष्ठाता, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्था.

loading image