आता अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना आठवड्यातील एक तास झेडपी शिक्षकांचा

विकास गाढवे
Wednesday, 3 February 2021

जिल्हा परिषदेचे शिक्षक आठवड्यातून एक तास अंगणवाड्यांतील बालकांना शिक्षण देणार आहेत

लातूर: जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या वाढवण्यासाठी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी अभिनव संकल्पना मांडली आहे. या संकल्पनेत अंगणवाड्यांतील बालकांना जिल्हा परिषदेच्या शाळांत प्रवेश देण्यासाठी पायाभरणी करण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा परिषदेचे शिक्षक आठवड्यातून एक तास अंगणवाड्यांतील बालकांना शिक्षण देणार आहेत. ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी नियोजनबद्ध आराखडा तयार करण्याचे आदेश पृथ्वीराज यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी (ता. दोन) आयोजित पोषण आहार व बेटी बचाओ - बेटी पढाओ अभियानाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, उममुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालविकास) डी. एम. गिरी, जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती ज्योती राठोड उपस्थित होते.

औसा सार्वजनिक बांधकाम उपविभाग आता लातूर विभागात

खासगी शाळांमुळे जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. ही संख्या वाढवण्यासाठी जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकांनी अंगणवाडीतील बालकांवर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. अंगणवाड्यांतील बालकांना जिल्हा परिषदेच्या वतीने पोषण आहार व अन्य सुविधा देण्यात येतात. यामुळे या बालकांनी वयाची सहा वर्षे पूर्ण केल्यानंतर जिल्हा परिषदेच्या शाळांत प्रवेश घेण्यासाठी पायाभरणी झाली पाहिजे. यातूनच शिक्षकांनी अंगणवाड्यांतील बालकांना आठवड्यातील दर शुक्रवारी एक तास जाऊन शिक्षण देण्याची संकल्पना पृथ्वीराज यांनी मांडली. यामुळे शिक्षकांसोबत बालकांची ओळख वाढून त्यांना अंगणवाडीत असतानाच जिल्हा परिषदेच्या शाळेबाबत आकर्षण व गोडी वाढणार आहे.

बालकांचे प्रवेश जिल्हा परिषद शाळेतच होण्याची शक्यता वाढणार आहे. उपक्रमासाठी नियोजनबद्ध आराखडा तयार करण्याचे आदेश पृथ्वीराज यांनी दिले आहेत. अंगणवाड्या सुरू होताच हा उपक्रम राबवण्याचे नियोजन असल्याचे उपशिक्षणाधिकारी विशाल दशवंत यांनी सांगितले.

सरपंच निवडीपूर्वीच अपात्रतेच्या खेळाला सुरवात, राजकीय रस्सीखेच सुरू

अंगणवाड्या अनौपचारिक शिक्षण 
या उपक्रमानिमित्त अंगणवाड्यांतील बालकांना अनौपचारिक शिक्षण मिळून अंगणवाड्यांच्या दर्जावाढीच्या जिल्हा परिषदेच्या प्रयत्नांना चालना मिळणार असल्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी गिरी यांनी सांगितले. दरम्यान, सर्व अंगणवाड्या सर्वसोयींनीयुक्त असण्याची गरज जिल्हाधिकारी पृथ्वीराज यांनी व्यक्त केली. बैठकीला तालुक्यातील सर्व एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी, विस्तार अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. शुक्ला वारद यांनी सादरीकरण केले. किशोर गोरे यांनी आभार मानले.

(edited by- pramod sarawale)
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Latur Breaking news Anganwadi students have one hour a week of ZP teacher