चाकूर बाजार समितीवर प्रशासक नियूक्तीचा आदेश खंडपीठाकडून रद्द

प्रशांत शेटे
Tuesday, 2 March 2021

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची मुदत ६ सप्टेंबर रोजी संपली होती

चाकूर (लातूर): चाकूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची मुदत संपल्यानंतर प्रशासक नियुक्तीचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने रद्द ठरविला असून या आदेशानंतर सभापती प्रशांत पाटील यांनी मंगळवारी (ता.२) प्रशासकाकडून पुन्हा पदभार स्वीकारला आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची मुदत ६ सप्टेंबर रोजी संपली होती. यानंतर १६ सप्टेंबर रोजी जिल्हा उपनिबंधकांनी संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासकाची नियुक्ती केली होती. कोरोनामुळे बाजार समितीची निवडणूक घेणे शक्य होणार नसल्यामुळे त्याच संचालक मंडळाला मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला होता. तरीही प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली होती.

बीड-जालना महामार्गावर कापसाच्या वेअर हाऊसला आग; आग आटोक्यात आणण्यासाठी शर्तीचे...

याविरूध्द सभापती प्रशांत पाटील यांच्या अकरा संचालकांनी अॅड. एस. एस. ठोंबरे यांच्या मार्फत औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. चाकूर बाजार समिती वगळून मुदत संपलेल्या इतर बाजार समितीच्या संचालक मंडळाला मुदत वाढ देण्यात आली होती. ही बाब खंडपीठाच्या निदर्शनास आणून देण्यात आली.

हिंगोलीत रस्त्याने विनाकारण फिरणाऱ्यांना पोलिसांचा चाप, संचारबंदीचा दुसरा दिवस

यावरून न्यायमूर्ती एस. व्ही. गंगापुरवाला व न्यायमूर्ती श्रीकांत कुलकर्णी यांनी चाकूर बाजार समितीवरील प्रशासक नियुक्तीचा आदेश रद्द ठरवला आहे. या आदेशानंतर सभापती प्रशांत पाटील यांनी प्रशासक श्री. जोगदंड यांच्याकडून सभापतीपदाचा पदभार स्वीकारला. यावेळी नगरसेवक अॅड. संतोष माने, संचालक संजय पाटील, विलास सुर्यवंशी, सरपंच मार्शल माने आदी उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Latur breaking news Bench cancels order for appointment of administrator on Chakur Bazar Samiti