शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी आठ वर्षीय संस्कृतीचा विमा कंपनीविरोधातील आंदोलनात सहभाग

केतन ढवण
Monday, 8 February 2021

विमा कंपनी आपला मनमानी कारभार करू पाहत असून शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक केली जात असल्याचे आरोप कंपनीवर केले जात आहेत

उजनी (लातूर): येथील शेतकरी पुत्रांच्या साखळी उपोषणाचा कालचा तिसरा दिवस होता. रविवारी (ता. सात) आशिव व बिरवली (ता. औसा) येथील शेतकऱ्यांनी उपोषण केले. यावेळी येथील आठ वर्षीय एका शेतकरी कन्येने दिवसभर उपोषणस्थळी बसून आंदोलनात उत्स्फूर्त सहभाग नोंदवत सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.

विमा कंपनी आपला मनमानी कारभार करू पाहत असून शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक केली जात असल्याचे आरोप कंपनीवर केले जात आहेत. ७२ तासांत नुकसानीची माहिती देणाऱ्या मोजक्या शेतकऱ्यांनाच कंपनी विमा देणार असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. कंपनीने या नियमांची जनजागृती न केल्यामुळे तालुक्यातील हजारो शेतकरी असे आहेत ज्यांना नुकसानीची माहिती विमा कंपनीला कळवावी लागते हेच माहिती नव्हते. त्यामुळे असे असंख्य शेतकरी विम्यापासून वंचित राहणार असल्याची चिन्हे आहेत. परिणामी यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

Success Story: माळरानावर फुलवली जैविक भाजीपाला शेती; शेती पाहण्यासाठी परिसरातील...

उजनीतील शेतकरी पुत्रांनी पुढाकार घेऊन मागील चार महिन्यांपासून परिसरातील गावांमध्ये पिकविमा प्रक्रियेमधील त्रुटी आणि जाचक अटीबाबत जनजागृती केली होती. विमा कृषीमंत्री दादाजी भुसे, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर तसेच कंपनी सोबत जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात झालेल्या शेतकरी पुत्रांच्या बैठकीत समाधानकारक तोडगा निघाला नाही. सदर त्रुटी व अटी रद्द करण्यासाठी कंपनी सकारात्मक असल्याचे दिसून आले नव्हते. म्हणून लढा कायम ठेवत शेतकरी पुत्रांनी कंपनी विरोधात आंदोलन करण्याचा निर्णय घेतला.

परभणी जिल्हा रुग्णालयातील आगीतून संशयाचा धुर , बारा तासात दुसरी घटना 

दरम्यान शुक्रवार (ता. पाच) पासून शेतकरी पुत्रांचे साखळी उपोषण सुरू झाले असून आज उपोषणाचा तिसरा दिवस आहे. परिसरातील रोज एक गाव याप्रमाणे उजनी येथे साखळी उपोषण केले जात आहे. पहिल्या दिवशी उजनी आणि दुसऱ्या दिवशी एकंबी येथील शेतकऱ्यांनी उपोषणात भाग घेतला होता. रविवारी म्हणजेच तिसऱ्या दिवशी अशिव व बिरवली येथील शेतकऱ्यांनी उपोषण केले. आजच्या दिवशी बिरवली येथील संस्कृती पाटील या आठ वर्षीय शेतकरी कन्येने या आंदोलनात उत्स्फूर्तने सहभाग घेऊन विमा कंपनीने शासनाचे पंचनामे ग्राह्य धरुन विमा द्यावा अशी मागणी तिने केली. यावेळी सर्वजण तिचे कौतुक करत होते.

(edited by- pramod sarawale)
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Latur breaking news Eight year old farmers daughter participates in agitation against insurance company