धक्कादायक! अवघ्या एकोणीसशे रुपयासांठी खून; करडखेलच्या `त्याʼ खुनाचे गूढ उकलले

युवराज धोतरे 
Monday, 8 February 2021

गेल्या महिन्यात करडखेल ते लोहारा दरम्यान रस्त्यालगत थांबलेल्या ट्रकच्या ड्रायव्हरचा खून झाल्याची घटना घडली होती

उदगीर (लातूर): गेल्या महिन्यात करडखेल ते लोहारा दरम्यान रस्त्यालगत थांबलेल्या ट्रकच्या ड्रायव्हरचा खून झाल्याची घटना घडली. या खुनाचे गुढ ग्रामीण पोलिसांनी उकलले असून अवघ्या एकोणीसशे रुपयासाठी खून झाल्याचे समोर आले.या प्रकरणातील दरोडेखोरांच्या मोरक्यायाला ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक गणेश गायके यांनी दिलेली अधिक माहिती अशी की करडखेल-उदगीर रस्त्यावर आनंद तुळशीदास मोकाशे (वय-४४) रा. आजनसोडा (ता.चाकुर) हा पाच जानेवारी रोजी ट्रक क्रमांक एम एच ०९ सीयु ६९०० ट्रकमध्ये उदगीरहून लातूरकडे धान्य घेऊन निघाला होता. रात्री दहाच्या सुमारास लोहारा ते करडखेल या दरम्यान रस्त्याचे काम चालू असल्याने हा ट्रक मुरुमामध्ये फसला. हा ट्रक निघणे शक्य नाही सकाळी काढता येईल असा निरोप मालकास दिला व फसलेल्या ट्रकमध्ये झोपून राहिला. पहाटे चारच्या सुमारास या ट्रकचालकाचा तेथेच रस्त्यालगत खून झाला असल्याचे नागरिकांना लक्षात आले.याप्रकरणी अज्ञात गुन्हेगारावर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी आठ वर्षीय संस्कृतीचा विमा कंपनीविरोधातील...

जिल्हा पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, उपविभागीय पोलिस अधिकारी डॅनियल बेन, पोलीस निरीक्षक दीपककुमार वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक श्री गायके यांनी या गुन्ह्याचा तपास केला. लातूरच्या एलसीबी पथकासोबत व ग्रामीण ठाण्याच्या डीबी पथकाच्या मदतीने ह्या गुन्ह्याचा डमडाटा आधारे तपास करत असताना मोबाईल टावर लोकेशन वरुन पोलीस आरोपी पर्यंत पोहोचले. हा खून रोड रॉबरीमधून झाला असल्याचे लक्षात आले.

या प्रकरणातला आरोपी औराद (जि.बिदर) येथील कृष्‍णा बाबु शिंदे यास अटक केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. या रस्त्यावर थांबलेल्या ट्रकच्या काचा फोडून हे चोरटे आत गेले व त्या झोपेत असलेल्या ड्रायव्हरच्या खिशामध्ये हात घालून पैसे काढून घेण्याचा प्रयत्न करु लागले. त्याच्या जवळ असलेले एकोणीसशे रुपये तो देत नसल्याने त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. या ड्रायव्हरने गाडी खाली उतरून पळ काढण्याचा प्रयत्न केला असता त्याला गाठून चाकूने सपासप वार करून त्याचा खून करण्यात आला.

Success Story: माळरानावर फुलवली जैविक भाजीपाला शेती; शेती पाहण्यासाठी परिसरातील...

त्याच्याकडून एकोणीसशे रुपये घेऊन हे चोरटे पसार झाले. यांच्या मोबाईल लोकेशन वरून हा तपास करण्यात आला व या आरोपीचे साथीदार सतीश शिंदे (रा.वसमत) अनिल चव्हाण, कृष्णा चव्हाण (दोघेही रा.देवणी) यांच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला असून एका आरोपी अटक तर तीन फरार आहेत.या तपासकामी डीबी पथकाचे नामदेव सारूळे, चंद्रकांत कलमे, तुळशीदास बरुरे, राहुल गायकवाड, दयाराम सूर्यवंशी यांच्यासह लातूरच्या एलसीबी पथकाने सहकार्य केले अशी माहिती उपनिरीक्षक श्री गायके यांनी यावेळी दिली आहे.

(edited by- pramod sarawale)
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Latur breaking news Murder for nineteen hundred rupees The mystery of Kardakhels murder solved