Latur Crime : मित्राचा खून करून मृतदेह टाकला नदीत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

murde

Latur Crime News: मित्राचा खून करून मृतदेह टाकला नदीत

लातूर : अनैतिक संबंधाच्या संशयावरून मित्राचा खून करून त्याचा मृतदेह मांजरा नदीत टाकून देऊन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एकास अटक करण्यात आली. या प्रकरणी विवेकानंद चौक पोलिस ठाण्यात सोमवारी (ता. २१) खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

ब्रह्मवाडी (ता. चाकूर) येथील सुग्रीव अप्पाराव कांबळे व आटोळा (ता. चाकूर) येथील राम कुमदाळे हे दोघे मित्र होते. या दोघांनी एक आयशर टेम्पो घेतला होता. तीन दिवसांपूर्वी टेम्पोमध्ये माल घेऊन ते येथे आले होते. शुक्रवारी (ता. १८) सायंकाळी रिंगरोडवरील गोजमगुंडे यांच्या मळ्याजवळ हा टॅम्पो उभा होता. त्यात या दोघांचे टॅम्पोच्या हिशेबावरून भांडण झाले. हे भांडण व राम कुमदाळे हा आपल्या पत्नीशी अनैतिक संबंधातून सतत फोनवरून बोलतो या संशयावरून सुग्रीव कांबळे याने टेम्पोच्या केबीनमध्येच राम कुमदाळेचा तोंडावर व पोटात चाकूने वार करून खून केला.

त्यानंतर मृतदेह एका चादरीत बांधून तो चामेवाडी (शिवणी) ता. लातूर शिवारातील मांजरा नदीवरील पुलावरून नदीपात्रात फेकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. घटनेनंतर सुग्रीव अप्पाराव कांबळे यानेच विवेकानंद चौक पोलिसांत तक्रार दिली. त्यानंतर स्वतः फिर्यादी सुग्रीव अप्पाराव कांबळे याने स्वतः होऊन पोलिसांकडे कबुली जबाब दिला. या प्रकरणी विवेकानंद चौक पोलिस ठाण्यात कांबळे याच्या विरोधात खूनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.