मोबाईलवर मोठ्याने बोलू नको म्हणणे बेतले जीवावर, काठी व दगडाने क्रूरपणे तरुणाचा खून

राम काळगे
Saturday, 20 February 2021

गुन्हा दाखल होऊनही पोलिसाकडून संबंधित आरोपीना अटक झाली नसल्यामुळे संतप्त नातेवाईकाना निलंगा पोलिस ठाण्यासमोर ठिय्या मांडला आहे.

निलंगा (जि.लातूर) : बामणी (ता.निलंगा) येथे घरासमोर मोबाईलवर मोठ्याने बोलू नको अशा शुल्लक कारणावरून घरात घुसून एकास गावातील दहा तरूणांनी काठीने व दगडाने ठेचून खून केल्याची घटना शुक्रवारी (ता.१९) रात्री घडली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, गावातील काही तरूण घराच्या शेजारील कॅनलजवळ बसून मोबाईलवर मोठ-मोठ्या आवाजाने बोलत असताना गावातील जगन्नाथ किशन शिंदे व अन्य जण विचारले असता तो राग मनात धरून गावातील दहा तरूणांनी घरासमोर बोलावून तू आम्हाला फोनवर मोठ्या आवाजाने बोलण्यास का विरोध करतोस असे म्हणत काठी व दगडाने मारहाण करण्यास सुरवात केली. यामध्ये जागीच मृत्यू झाला.

मृताची बहिण सुनिता अर्जून रणदिवे यांनी निलंगा पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून  बापू ढाले, हाणमंत गायकवाड, राम गायकवाड, गोरख गायकवाड, अरविंद गायकवाड, शेषीकांत गायकवाड, मल्हारी गायकवाड, दिगंबर गायकवाड, शंभो गायकवाड, शाम गायकवाड (सर्व राहणार बामणी, ता.निलंगा) यांच्याविरूद्ध निलंगा पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास उपविभागीय अधिकारी दिनेशकुमार कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अनिल चोरमले करत आहेत.

वाचा - एका उंदरामुळे औरंगाबादला ३२ तासानंतर सुरु झाला पाणीपुरवठा! नागरिकांची पाण्यासाठी ओरड

दरम्यान गुन्हा दाखल होऊनही पोलिसाकडून संबंधित आरोपीना अटक झाली नसल्यामुळे संतप्त नातेवाईकाना निलंगा पोलिस ठाण्यासमोर ठिय्या मांडला आहे. पोलिसांनी दोन आरोपीना अटक केली असून आठ आरोपी फरार आहेत. सर्वच आरोपी अटक करावी म्हणून नातेवाईक ठाम आहेत. यामुळे गावात सध्या तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून आजच्या तरूण पिढीकडून असे अनेक गैरकर्ते घडत असून किरकोळ कारणाचे पर्यावसन खूनापर्यंत जात आहेत.अशा किरकोळ घटनांना आळा घालण्याची मागणी समाजातून होत आहे.

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Latur Crime News Ten People Brutelly Killed Youth In Bamani Nilanga