
माहिती मिळताच पेट्रोलिंग करीत पोलिसांनी तत्काळ शोध मोहीम राबविली.
औराद शहाजानी (जि.लातूर) : औराद शहाजानी (ता.निलंगा) येथील बसस्थानकात गुरुवारी (ता. चार) मध्यरात्री मुक्कामी असलेली बस चोराने पळवली. दरम्यान, पोलिसांच्या सतर्कतेमुळे चोरीस गेलेली बस रात्रीच मिळाली. नंतर घटनेचा पंचनामा करून ती एसटी महामंडळाकडे सुपूर्द करण्यात आली.
या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निलंगा आगारातील एमएच-२० बीएल ०२७१ क्रमांकाची एसटी बस गुरुवारी मध्यरात्री औराद शहाजानी येथील बसस्थानकात मुक्कामी होती. वाहक व चालक बसस्थानकात झोपले होते. ही मुक्कामी असलेली बस अज्ञात चोराने रात्री अडीचच्या दरम्यान पळवली. ही बाब लक्षात येताच चालकाने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच पेट्रोलिंग करीत पोलिसांनी तत्काळ शोध मोहीम राबविली. पोलिसांना शेळगी येथे ही बस सापडली. चोराचा शोध सुरू असल्याची माहिती साहाय्यक पोलिस निरीक्षक सुधीर सूर्यवंशी यांनी दिली.
Edited - Ganesh Pitekar