
पुढील काळात सरकारी यंत्रणांनाही या जबाबदारीतून मुक्त होण्याची संधी मिळेल. त्यामुळे या सुविधेचा लाभ लोक मोठ्या प्रमाणात घेतील.
लातूर : कोरोना बाधितांसाठी अत्यावश्यक आरोग्य सुविधा व यंत्रणा उपलब्ध करून देण्यासाठी सावली कोविड केअर सेंटरप्रमाणे अन्य वैद्यकीय व्यावसायिकांनाही पुढे यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी केले. येथील मानसोपचार तज्ज्ञ तथा सावली सेंटर फॉर मेंटल हेल्थचे संचालक डॉ. मिलिंद पोतदार यांनी ३० खाटाचे कोविड केअर सेंटर सुरु केले आहे. याच्या उदघाटनवेळी ते बोलत होते. यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक हिंमत जाधव, आयएमएचे अध्यक्ष डॉ. विश्वास कुलकर्णी,डॉ.अशोक पोद्दार, डॉ. गिरीश पत्रिके उपस्थित होते.
कोरोना बाधितांसाठी अशा प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी खासगी वैद्यकीय व्यावसायिकांनी स्वतःहून पुढाकार घेणे गरजेचे आहे. कोरोना बाधितांसाठी मानसिक समुपदेशन अत्यंत महत्वाचे असते. डॉ. मिलिंद पोतदार हे स्वतःच एक मानसोपचार तज्ज्ञ आहेत. त्यामुळे ते कोरोना बाधितांचे समुपदेशन अत्यंत दर्जेदारपणे करू शकणार आहेत. याठिकाणचे सर्व कर्मचारीही प्रशिक्षित असल्याने रुग्णांना चांगल्या पद्धतीने सेवा पुरवल्या जातील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
अशा सुविधा खासगी स्तरांवर उपलब्ध झाल्याने सरकारी यंत्रणांवरील ताण हलका होईल. पुढील काळात सरकारी यंत्रणांनाही या जबाबदारीतून मुक्त होण्याची संधी मिळेल. त्यामुळे या सुविधेचा लाभ लोक मोठ्या प्रमाणात घेतील, अशी अपेक्षाही श्री. जाधव यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. मिलिंद पोतदार यांनी केले. प्रास्ताविकात त्यांनी आपल्या कोविड सेंटरमध्ये कोरोना विषाणूची लागण झालेल्या सौम्य स्वरूपाची लक्षणे असणाऱ्या रुग्णांच्या उपचाराची व विलगीकरणाची सोय उपलब्ध करून देण्यात आल्याचे सांगितले.
संपादन - सुस्मिता वडतिले