लातूरचे जिल्हाधिकारी श्रीकांत म्हणतात, बिनधास्त वाचा वृत्तपत्र !

विकास गाढवे
बुधवार, 8 एप्रिल 2020

अचूक व तपशीलवार बातम्यांसाठी वृत्तपत्रांशिवाय पर्याय नाही. बातम्यांसाठी वृत्तपत्र हे एकमेव विश्वसनीय माध्यम आहे. लोकशिक्षण घडवून येणाऱ्या बातम्या वृत्तपत्रांतूनच दिल्या जातात. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी सरकारने लागू केलेल्या लॉकडाऊनमध्ये सर्वांना वृत्तपत्रांचाच आधार आहे. यामुळे वृत्तपत्रांबाबत कोरोनाची भीती न बाळगता लोकांनी बिनधास्त वृत्तपत्रांचे वाचन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी केले आहे.

लातूर : अचूक व तपशीलवार बातम्यांसाठी वृत्तपत्रांशिवाय पर्याय नाही. बातम्यांसाठी वृत्तपत्र हे एकमेव विश्वसनीय माध्यम आहे. लोकशिक्षण घडवून येणाऱ्या बातम्या वृत्तपत्रांतूनच दिल्या जातात. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी सरकारने लागू केलेल्या लॉकडाऊनमध्ये सर्वांना वृत्तपत्रांचाच आधार आहे. यामुळे वृत्तपत्रांबाबत कोरोनाची भीती न बाळगता लोकांनी बिनधास्त वृत्तपत्रांचे वाचन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी केले आहे.

सरकार व प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या सूचना व संदेश तळागाळातील लोकांपर्यंत पोचविण्याचे काम वृत्तपत्रे करतात. वृत्तपत्रांत चुकीची बातमी प्रसिद्ध झाली तर दुसऱ्या दिवशी दुरुस्त करता येते. वृत्तपत्रांमुळेच वाचन संस्कृती टिकून आहे. आपल्या परिसरासह देश व विदेशातील घडामोडींची माहिती वृत्तपत्रांमुळे होते. जिल्हा प्रशासनालाही जिल्ह्याच्या विविध भागांतील घडामोडी माहीत होतात. त्यावरून उपाययोजना करणे सोयीचे होते. सोशल मीडियामुळे विविध घटनांबाबत संभ्रम निर्माण होतो. मात्र, वृत्तपत्रांच्या बाबतीत तसे होत नाही. लोक विश्वासाने वृत्तपत्रांचे वाचन करतात. हा विश्वास वृत्तपत्रांनी टिकवून ठेवला आहे. यामुळेच वृत्तपत्र ही समाजाचा अविभाज्य घटक बनली आहेत.

वाचा ः  औशात सोशल डिस्टन्सिंगसह संचारबंदीचा फज्जा, बँकेसमोर गर्दी अन् रस्ते माणसांनी...

टाळेबंदीच्या काळात सध्या लोकांना वृत्तपत्रांचा मोठा आधार मिळत आहे. वृत्तपत्र वाचनामुळे वेळ व्यतित होत असून कोरोनाच्या उपाययोजना; तसेच अन्य माहिती लोकांना घरबसल्या होत आहे. सोशल मीडियावरील बातम्यांमुळे निर्माण होणारा संभ्रम दूर होत आहे. वृत्तपत्रांमुळे कोरोनाचा संसर्ग होत नाही. तरीही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वृत्तपत्रांकडून पुरेशी काळजी घेण्यात येत आहे. सर्वांच्या जीवनाच्या वाटेवर आयुष्याची सोबत करणाऱ्या वृत्तपत्रांबाबत गैरसमज करून घेऊ नये व नियमित वृत्तपत्रांचे वाचन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी केले आहे.

ॲपवर माहिती भरल्यास डॉक्टर करणार संपर्क
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेच्या वतीने विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्याचा एक भाग म्हणून महापालिकेच्या वतीने लातूरकरांसाठी अँड्रॉईड ॲप तयार करण्यात आले आहे. या ॲपद्वारे माहिती भरल्यास महापालिकेचे संबंधित डॉक्टर संपर्क करून मार्गदर्शन व वैद्यकीय उपचार करण्यास साहाय्य करणार आहेत. लातूरकरांसाठी खास ही सुविधा तयार करण्यात आली आहे.लातूर महानगरपालिकेच्या वतीने ‘कोविड-१९’ हे अॅप तयार करण्यात आले आहे. https://drive.google.com/file/d/1tAYj2-SCkqNhO5xMBQKyy4iOs_Xd-qTv/view?u... या लिंकवर क्लिक करून सदर ॲप डाऊनलोड करून घेता येणार आहे.

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Latur District Collector Shrikant Said, Fearlessly Read News Paper