कोरोना रोखण्यासाठी ः लातूर जिल्हा बँकेने दिला एक कोटी ११ लाखांची मदत

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 31 मार्च 2020

देशात आणि राज्यात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत आहे. केंद्र व राज्य शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत माजी मंत्री दिलीपराव देशमुख व पालकमंत्री अमित देशमुख यांच्या सूचनेनुसार लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी एक कोटी ११ लाखांची मदत करण्यात आली आहे. अशा पद्धतीची मदत करणारी राज्यातील ही पहिली जिल्हा बँक आहे.

लातूर  ः देशात आणि राज्यात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत आहे. केंद्र व राज्य शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत माजी मंत्री दिलीपराव देशमुख व पालकमंत्री अमित देशमुख यांच्या सूचनेनुसार लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी एक कोटी ११ लाखांची मदत करण्यात आली आहे. अशा पद्धतीची मदत करणारी राज्यातील ही पहिली जिल्हा बँक आहे.

या मदतीचा धनादेश मंगळवारी (ता. ३१) जिल्हा बँकेचे अध्यक्ष अॅड. श्रीपतराव काकडे यांनी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्याकडे सुपूर्द केला. बँकेने जिल्ह्यातील शेतकरी, बँक कर्मचारी यांच्या वतीने कोरोनाबाधित आपद्ग्रस्त कुटुंबाला मदत व्हावी, यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. बँकेने सातारा, कोल्हापूर, सांगली पूरग्रस्तांच्या मदतीसाठी २१ लाख रुपये, तर लातूर शहराला पाणीटंचाईच्या काळात मांजरा नदी खोलीकरणासाठी ११ लाख रुपये मदत केली होती. त्यामुळे जिल्हा बँकेचे शेतकरी सभासद नुसती मदत घेतो असे नव्हे तर मदतसुद्धा करतो हे बँकेने दाखवून दिले आहे. या एक कोटी ११ लाख रुपयांचा मदत निधीत बँक कर्मचाऱ्यांचा ११ लाख रुपयांचा वाटा आहे.

वाचा ः लातुरात सहा ठिकाणी मिळणार शिवभोजन, संचारबंदीत गरजूंना मिळतोय आधार

लातूर जिल्हा बँक माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत आहे. संकटकाळी मदतीला धावून जाणारी ही राज्यातील ही एकमेव जिल्हा बँक असल्याचे बँकेने दाखवून दिले आहे. यावेळी उपाध्यक्ष पृथ्वीराज सिरसाठ, संचालक एस. आर. देशमुख, कार्यकारी संचालक हनमंत जाधव उपस्थित होते. याबाबत जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी कोरोनाग्रस्तांसाठी लातूर जिल्ह्यातून प्रथमच मोठी आर्थिक मदत एक कोटी ११ लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीस मिळाला आहे. त्याबद्दल त्यांनी माजी मंत्री दिलीपराव देशमुख, बँकेचे अध्यक्ष काकडे, संचालक मंडळ, शेतकऱ्यांचे आभार मानले.

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Latur District Cooperative Bank Give One Crore And 11 Lack CM Fund, Latur