
सियाचीन सीमेवर गस्त घालत असताना अचानक वाहन खोल दरीत कोसळून निलंगा तालुक्यातील उमरगा (हा.) येथील जवान नागनाथ अभंग लोभे (वय ३५) यांना वीरमरण आल्याची दुर्दैवी घटना रविवारी (ता.२०) सकाळी घडली.
निलंगा (जि.लातूर) : सियाचीन सीमेवर गस्त घालत असताना अचानक वाहन खोल दरीत कोसळून निलंगा तालुक्यातील उमरगा (हा.) येथील जवान नागनाथ अभंग लोभे (वय ३५) यांना वीरमरण आल्याची दुर्दैवी घटना रविवारी (ता.२०) सकाळी घडली. येथील जवान नागनाथ अभंग लोभे इंडियन आर्मी इंजिनिअर १०६ मध्ये कार्यरत होते. मागच्या अनेक वर्षांपासून सियाचीन सीमेवर कर्तव्यावर होते. रविवारी सकाळी चार जवान एका वाहनातून सीमेवर गस्त घालत होते.
अचानक दरड कोसळून त्यांची वाहन खोल दरीमध्ये कोसळून पडली. त्यात चारही जवानांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. घटनेची माहिती रविवारी उशिरा ग्रामस्थांना समजताच संपूर्ण गावावर लोकाकुल वातावरण निर्माण झाले. अंत्यविधीच्या तयारीसाठी ग्रामस्थ व प्रशासनाने तयारी सुरू केली असून मंगळवारी (ता.२२) दुपारनंतर अंत्यविधी केला जाईल, असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे. जवान नागनाथ अभंग लोभे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई व वडील असा परिवार आहे.
संपादन - गणेश पिटेकर