जिल्हा अन् राज्य सीमांवर नाकाबंदी करावी, पालकमंत्री अमित देशमुखांचे आदेश

सकाळ वृत्तसेवा
Monday, 20 April 2020

कोरोना विषाणू प्रतिबंधासाठी टाळेबंदीत लातूर जिल्ह्यात एकही कोरोनाबाधित रुग्ण नाही. त्यामुळे लातूर जिल्ह्याच्या सर्व जिल्हा सीमा व राज्य सीमांवर कडेकोट नाकाबंदी करावी. परजिल्ह्यातील तसेच परराज्यातील एकही व्यक्ती लातूर जिल्ह्यात येणार नाही, याची काळजी घ्यावी. परराज्यातून अनधिकृत व्यक्ती जिल्ह्यात येऊ नये याकरिता सर्व तपासणी नाक्यांवर हाय रिझोल्युशनचे सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, असे आदेश वैद्यकीय शिक्षण व तथा पालकमंत्री अमित देशमुख यांनी सोमवारी (ता.२०) येथे दिले.

लातूर ः कोरोना विषाणू प्रतिबंधासाठी टाळेबंदीत लातूर जिल्ह्यात एकही कोरोनाबाधित रुग्ण नाही. त्यामुळे लातूर जिल्ह्याच्या सर्व जिल्हा सीमा व राज्य सीमांवर कडेकोट नाकाबंदी करावी. परजिल्ह्यातील तसेच परराज्यातील एकही व्यक्ती लातूर जिल्ह्यात येणार नाही, याची काळजी घ्यावी. परराज्यातून अनधिकृत व्यक्ती जिल्ह्यात येऊ नये याकरिता सर्व तपासणी नाक्यांवर हाय रिझोल्युशनचे सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, असे आदेश वैद्यकीय शिक्षण व तथा पालकमंत्री अमित देशमुख यांनी सोमवारी (ता.२०) येथे दिले.

येथील शासकीय विश्रामगृहाच्या सभागृहात आयोजित पोलिस विभाग, प्रादेशिक परिवहन कार्यालय व महापालिकेच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी संसदीय कार्य राज्यमंत्री संजय बनसोडे, महापौर विक्रांत गोजमगुंडे, उपमहापौर चंद्रकांत बिराजदार, पोलिस उपअधीक्षक सचिन सांगळे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील, महापालिकेच्या सहायक आयुक्त वसुधा फड उपस्थित होत्या. लातूर महापालिकेने शहरात प्रवेश करण्याच्या सर्व सहा ठिकाणांवर तपासणी नाका तयार करून नाकाबंदी करावी. शेतकऱ्यांना कृषिविषयक खरेदीसाठी मुभा असेल परंतु प्रशासनाने दक्षता घ्यावी. तसेच लातूर शहरासह इतर सर्व नगरपालिकेच्या हद्दीबाहेरील रस्त्यावर तपासणी नाके तयार करून नाकाबंदी करावी, असे आवाहन देशमुख यांनी केले. महानगरपालिकेने आवश्यक असेल तरच बांधकाम परवानगीबाबतची कार्यवाही करावी. प्रत्येक नाक्यावर वैद्यकीय अधिकारी, पोलिस कॉन्स्टेबल, महापालिका/नगरपालिकेचा कर्मचारी ठेवावा. त्या ठिकाणी प्रत्येक व्यक्तीची तपासणी व्हावी, असे निर्देश त्यांनी दिले. जिल्ह्याच्या राज्य सीमांवर अधिक दक्षता घ्यावी. हैदराबादहून येणाऱ्या रस्त्यांवर नाकाबंदी अधिक कडक करावी, अशी सूचना राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केली.

हेही वाचा ः लातूरकरांमुळेच मिळाले आम्हाला नवे आयुष्य, ‘कोरोना’शी लढा दिलेल्या नागरिकांची...

थोडीसी ढील मिळताच लातूरकर रस्त्यावर
कोरोना विषाणुचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी सुरु असलेल्या टाळेबंदीमध्ये सरकारने काहीशी शिथिलता दिली आहे. पण आपण कोरोनामुक्त झालो आहोत अशा अविर्भावात नागरिक आहेत. सोमवारी (ता.२०) थोडीशी मोकळीक मिळताच लातूरकर रस्त्यावर आले. दिवसभर मोठ्या प्रमाणात दुचाकीवरून नागरिक फिरत होते. त्यांना परत घरी पाठवताना पोलिसांनाही कसरत करावी लागली. कधी मायेने तर कधी काठीचा धाकही त्यांना दाखवावा लागला. या पुढे दुचाकीवर दोन व्यक्ती बसून फिरताना दिसून आल्यास त्यांच्यावरही कारवाई करण्याचा इशारा पोलिसांच्या वतीने देण्यात आला आहे. कोरोना विषाणुचा प्रसार होऊ नये म्हणून उपाय योजनेचा एक भाग म्हणून सध्या दुसऱ्यांदा टाळेबंदी सुरु आहे. ता.तीन मेपर्यंत हे टाळेबंदी राहणार आहे.

हेही वाचा ः खरेदी केंद्र बंद, रेशीम विक्री औसा तालुक्यात खोळंबली

सोमवारपासून शासनाने काही बाबतीत शिथिलता दिल्याचे वृत्त दूरचित्रवाणी, वृत्तपत्रातून प्रसिद्ध झाले. सोशल मीडियावरही ते मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. त्यामुळे आपण कोरोनामुक्त झाल्याच्या अविर्भावात नागरिक आपले आहेत. आपण रस्त्याने फिरायला मोकळे झालो आहोत असे आता नागरिकांना वाटू लागले आहे. गेली महिना भर घरात बसून कंटाळा आल्याने आता मोकळा श्वास घेता येईल असे लोकांना वाटू लागले आहे. पण कोरोनाचे संकट अद्याप संपलेले नाही. ते घोंघावतच आहे. शासनाने नागरिकांना रस्त्यावर फिरण्यासाठी कोणतीही परवानगी दिलेली नाही. फक्त अत्यावश्यक सेवेसाठीच परवानगी आहे. असे असताना सुद्धा सोमवारी सकाळपासूनच शहरातील रस्त्यावर नागरीकांची विनाकारण गर्दी दिसून आली.

शहरातील शिवाजी चौक, मुख्य रस्ता, गंजगोलाई, राजीव गांधी चौक, महात्मा गांधी चौक, रेणापूर नाका आदी भागात नागरिक मोठ्या प्रमाणात दिसून आले. शहरातील रस्त्यावर गर्दी वाढत असल्याचे लक्षात येताच पोलिसांनाही रस्त्यावर यावे लागले. येथील गांधी चौकात पोलिस निरीक्षक संजय हिबारे यांच्या नेतृत्वाखालील पोलिसांच्या पथकाने रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई सुरु केली. पोलिस कारवाई करीत असल्याचे लक्षात आल्यानंतर काही वाहनधारकांनी मुख्य रस्त्यावर येण्याऐवजी मधले रस्ते धरले. काही रिक्षांनी हिंमत दाखवत रस्त्यावर येण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना पोलिसांच्या काठीचा प्रसाद खावा लागला. टाळेबंदी संपलेला नाही किंवा कोरोनाचे संकटही टळलेले नाही. त्यामुळे पहिल्या उपाय योजना सारख्याच उपाय योजना लागू राहणार आहेत. त्यामुळे शहरात दुचाकीवर दोघे बसून जात असतील तर त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशाराही पोलिसांनी दिला आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Latur District, State Borders To Be Close, Guardian Minister Deshmukh Order