लातूर : शेणखतासाठी शेतकऱ्यांची लगबग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Latur farm manure process with help of tractor

लातूर : शेणखतासाठी शेतकऱ्यांची लगबग

जळकोट : यावर्षीची खरिपपूर्व शेतीकामे सुरु असून मशागतीच्या कामातून वेळ काढत अनेक शेतकरी शेणखत घालत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे शिवारात ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेणखत घालण्याची सध्या लगबग असल्याचे चित्र आहे. पूर्वी बैलगाडीने आपल्या शेतात शेणखत घालत. त्यासाठी बैलगाडीला कापसाच्या पळाट्यापासून डालगे तयार केले जायचे. बैलगाडी तसेच बैलांना घुंगरमाळा घालत झेंडे बांधून सजवून गाडी तयार केली जायची व पहाटेपासून या कामाला सुरवात व्हायची.

अलिकडे हे सर्व कालबाह्य झाले असून ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेणखत घालण्याचे काम सुरू आहे.त्यासाठी ट्रॅक्टरचे भाडे, भरण्याची मजुरी, शेणखत शेतात पसरवण्याची मजुरी हे खर्च मात्र वाढले आहेत. अलिकडे नोकर,वाढलेली मजुरी तसेच चारा-पाण्याच्या समस्येमुळे जनावरांना बाजाराचा रस्ता दाखवला जात असून पशुधन घटत आहे. परिणामी सेंद्रिय शेतीसाठी शेणखताची वाणवा होत असल्याचे चित्र आहे. परंतु अलिकडे घटत असलेले पशुधन पाहता तालुक्यात शेणखत कमी झाले आहे. शेणखत मागणी वाढली असून ते महागले आहे. त्यामुळे शेतकरी हतबल झालेला पाहावयास मिळत आहे.

रासायनिक खताच्या अतिरिक्त वापरामुळे जमिनिचा दर्जा खालावत चाललेला आहे.पशुपालन खर्चही वाढत असून चारा पाण्याअभावी शेतकरी पशुधन विक्रीस काढत आहे. शेणखताचे एक ट्रॅक्टरची खरेदी करण्यासाठी सुमारे अडीच ते तीन हजार रुपये किंमत मोजावी लागत आहे. तर ट्रॅक्टरचे भाडे ते भरण्यासाठी मजुरी तसेच ते पसरवण्यासाठी वेगळी मजुरी लागते. सध्या शेतकरी आपल्याकडे असलेला शेणखत घालण्याच्या लगबगीत असल्याचे चित्र आहे.

शेतीत चांगला मुरलेला शेणखत घातला तर उत्पादन वाढते. जमिनीची प्रतवारी सुधारते. सेंद्रिय शेतीत शेणखताला महत्व आहे. कृषी विभागामार्फत शेणखताचे महत्व सांगत तशी जागृती करण्याचा आमचा प्रयत्न आहे.

- विशाल इंगळे, कृषी सहाय्यक

शेणखतामुळे शेतीत उत्पन्नही चांगले निघते.असा अनुभव असहे. घरी जनावरे ठेवताना चारा-पाण्याच्या तसेच मजुराच्या अडचणी येतात.तर शेणखत विकत घेणे परवडत नाही. अशी स्थिती आहे.

- रामेश्वर टेकाळे, शेतकरी