
जळकोट : कष्ट करण्याची तयारी, जिद्द, चिकाटी असल्यास शेतीत चांगले उत्पन्न मिळते, हे आजवर अनेकांनी दाखवून दिले आहे. आताही उमरगा रेतू (ता.जळकोट) येथील शेतकरी श्रीराम रघुनाथ ढोबळे यांनी पारंपारिक शेतीला फाटा देत मिरची व टरबूज लागवड करत साडेआठ लाखांचे उत्पन्न मिळविले आहे.
पारंपारिक शेतीला फाटा देत उमरगा रेतू येथील शेतकरी श्रीराम ढोबळे यांनी आपल्याकडील केवळ ९ एकर शेतीत विविध प्रयोग करत शेतीत चांगले उत्पन्न काढत इतरांना यशाचा मार्ग दाखवला आहे. त्यांना नुकताच जिल्हा परिषदेचा आदर्श शेतकरी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. यावर्षी श्री. ढोबळे यांनी साडेपाच एकरावर मिरची लागवड केली. यासाठी चाकूर येथून रोपे आणली. अंदाजे ३५ हजार रुपये रोपांसाठी लागले. आतापर्यंत ३० क्विंटल मिरचीची विक्री झाली असून, सरासरी साठ ते ६५ रुपये प्रतिकिलो भाव मिळत आहे.
एकूण अपेक्षित उत्पन्न ८० क्विंटल असून, तीन ते चार लाखापर्यंत उत्पन्न अपेक्षित असल्याचे श्री. ढोबळे यांनी सांगत आणखी पंधरा दिवस मिरचीची विक्री सुरु राहील असे सांगितले. मिरची पिकाच्या ठिकाणी पुढील काळात कोणतेही पीक जोमदार येते, असा त्यांचा अनुभव आहे. त्यात त्यांनी टरबुजाचेही पीक घेतले आहे. साधारणतः ४० हजार रुपयांचे बियाणे आणून त्याचे रोपे तयार केली. दोन टप्प्यात टरबूज लागवड केली. पहिल्या टप्प्यात तीन एकरमध्ये टरबूज लागवड केली, त्यात त्यांना ५०० क्विंटल एवढे उत्पन्न मिळाले.
सरासरी भाव १० रुपये ५० पैसे प्रमाणे लागला. अहमदपूरच्या व्यापाऱ्यांनी शेतातून माल नेला. हा फड आठ दिवसापूर्वी संपला. दुसऱ्या टप्प्यात पुन्हा अडीच एकरमध्ये टरबूज लागवड केली, त्याचाही तोडा नुकताच संपला आहे. एकूण टरबूज ७०० क्विंटल इतके निघाल्याचे श्री. ढोबळे यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. आजवर टरबूज व मिरचितून साडेआठ लाखांचे उत्पादन मिळाले, असून, आणखी दीड लाखांचे उत्पन्न मिरचितून अपेक्षित असल्याचे ढोबळे यांनी सांगितले.
श्रीराम ढोबळे यांच्या शेतात एक विहीर, एक बोअर व एक शेततळे असून, सिंचन व्यवस्थापन ते करतात. कृषिपूरक व्यवसायातून मत्स्यपालनाचा व्यवसायही ते करीत आहेत. बेवडसाठी मी मिरचीचे पीक घेतले. मी व माझे कुटुंब शेतात कष्ट करत भाजीपाला शेतीचे प्रयोग केले. कष्टातून यश मिळत आहे. काळी आई कष्ट केल्यास उपाशी ठेवत नाही, अशी श्रद्धा आहे.
- श्रीराम ढोबळे, शेतकरी उमरगा रेतू