esakal | Latur: साहेब, कशी भाकर आता गोड लागणार! शेतकऱ्यांनी मांडली व्यथा
sakal

बोलून बातमी शोधा

साहेब, कशी भाकर आता गोड लागणार! शेतकऱ्यांनी मांडली व्यथा

निलंगा : साहेब, कशी भाकर आता गोड लागणार! शेतकऱ्यांनी मांडली व्यथा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

निलंगा : ‘‘पाऊस थांबेना. नदीला रोजच पूर येतोय. महागामोलाचं बियाणं, खत घालून पेरलं. चिपटंभर रास हाताला लागली नाही. आता भाकर कशी गोड लागेल साहेब’’... अशी ह्रदय पिळवटून टाकणारी व्यथा तेरणा नदीकाठच्या सांगवी-जेवरी (ता. निलंगा) येथील अतिवृष्टीग्रस्त शेतकरी पंचनाम्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना सांगत होते.

‘‘कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टी. ही नैसर्गिक आपत्ती शेतकऱ्यांच्या माथी नित्याचीच बनली आहे. सोयाबीन पेरणीचे बियाणे साडेतीन हजार रुपये, खत, कीटकनाशक, फवारणी, पेरणी असा मोठा खर्च केला. मृगाचा पाऊस चांगला पडला (आगुटी) पेरणी केली.

हेही वाचा: बाधितांंना मरणानंतरही छळले ः मसणवट्यावरून राजकारण पेटले

पीकही जोमात आले होते. आठ-दहा दिवसांत काढणी होणार तेच अतिवृष्टी झाली. सर्व प्रकल्प, लहान मोठे धरण तुडूंब भरले होते. त्यातच तेरणा धरणातून पाणी सोडले अन् होत्याचे नव्हते झाले. सर्व पीक पुराच्या पाण्यात वाहून गेले. आता चिपटंभर रासही हाताला लागणार नाही. आता भाकर कशी गोड लागेल’, अशी व्यथा पंचनामे करण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांसमोर सांगवी-जेवरी येथील शेतकरी संतोष घाडगे, रावसाहेब कांबळे, शिवाजी सरतापे यांनी मांडली.

शेतीचे व पिकांचे महापूराने नुकसान झाले आहे. शासनाने लवकर मदत करण्याची गरज आहे. आता शेतकऱ्यांकडे काहीच उरलेले नाही. रब्बीची पेरणी कशी करावी याची चिंता लागली आहे. तेरणा नदीला सतत पूर येत असून, संपूर्ण क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे.

- रावसाहेब कांबळे

सरकारी मदत तुटपुंजी मिळेल. शासनाने अतिवृष्टीचे निकष बाजूला ठेवून अतिवृष्टीग्रस्त व पूरग्रस्त शेतकऱ्यांना वेगळी मदत करण्याची गरज आहे. विमा कंपनीकडून फक्त विमा भरून घेतला जातो. नुकसान भरपाई देण्यासाठी मात्र अनेक अडचणी सांगतात.

- शिवाजी सरतापे

loading image
go to top