
लातूर : लग्नातील जेवणातून दोनशे जणांना विषबाधा
निलंगा : केदारपूर येथील विवाह सोहळ्यातील जेवणातून दोनशे ते तीनशे वऱ्हाडींना रविवारी विषबाधा झाली. त्यांच्यावर निलंगा उपजिल्हा रूग्णालय, अंबुलगा (बु.), देवणी तालुक्यातील वलांडी व जवळगा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. बहुतांश जणांची प्रकृती सुधारत असल्याचे सांगण्यात आले.
केदारपूर येथील मुलीच्या विवाह जवळगा साकोळ (ता. देवणी) येथील मुलाशी काल केदारपूरला झाला. परिसरातील अनेक गावांतून वऱ्हाडी आले होते. पंगतीत भात, वरण, पोळी, वांग्याची भाजी, बुंदी असा बेत होता. जेवण करून वऱ्हाडी गावी परतले. सायंकाळी अनेकांना पोटदुखी, उलट्या, जुलाब असा त्रास सुरू झाला. त्यात काही मुलांचाही समावेश आहे. निलंगा उपजिल्हा रूग्णालय, वलांडी (ता. देवणी) अंबुलगा (बु.) येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, काटेवळगा, जवळगा उपकेंद्रासह काही जण खासगी दवाखान्यांत दाखल होऊ लागले. या सर्व ठिकाणी सुमारे दोनशे ते ते तीनशे जणांवर उपचार सुरू आहेत. जेवणातील वरणातून विषबाधा झाल्याचा अंदाज आहे. वरण खाल्ले अशांनाच त्रास झाला तर न खाणाऱ्यांना काही त्रास झाला नाही, असे उपचार घेत असलेले वऱ्हाडी सांगत आहेत.
अंबुलगा (बु.) येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. नरेंद्र माकणे, आरोग्य कर्मचारी जगदीश सगर यांनी काटेजवळगा, केदारपूर येथील वऱ्हाडींसाठी रुग्णवाहिका पाठवली. त्यांच्यावर रात्रभर उपचार केले. सर्वांची प्रकृती सुधारत असून, अजूनही काही रुग्ण दाखल होत असल्याचेही त्यांनी सांगितले.
नमुने पाठविले प्रयोगशाळेत
अंबुलगा (बु.) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आतापर्यंत ७० रुग्णांवर उपचार केले आहेत. अनेकांची प्रकृती बरी झाली आहे. उलटीचे नमुने प्रयोग शाळेत पाठवण्यात आले आहेत. आज सकाळी आणखी दहा रुग्ण दाखल झाले असून सर्वांवर योग्य उपचार केले जात असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. नरेंद्र माकणे यांनी दिली.
चौकशी करून अहवाल द्या : अमित देशमुख
लातूर : लग्नातील जेवणातून दोनशेहून अधिक जणांना विषबाधा झाल्याच्या प्रकारची पालकमंत्री अमित देशमुख यांनी दखल घेतली आहे. जिल्हाधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल उटगे, जिल्हा नियोजन समिती सदस्य अभय सांळुके, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलिस अधीक्षकांनी संबंधित गावांत भेट द्यावी, विचारपूस करून सर्वांवर तातडीने योग्य उपचार करावेत, घटनेची चौकशी करून सविस्तर अहवाल सादर करावा, असे निर्देश त्यांनी जिल्हाधिकारी व आरोग्य यंत्रणेला दिले आहेत.
Web Title: Latur Kedarpur Wedding Meal Poisoning Two Hundred People
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..