अभिलेखात आढळली तब्बल 125 वर्षांपूर्वीचे कागदपत्रं

विकास गाढवे
Thursday, 28 January 2021

जिल्हाधिकारी कार्यालयातील अद्ययावत रेकॉर्ड रूमचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उदघाटन झाले
 

लातूर: औरंगाबाद विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांच्या संकल्पनेतील `सुंदर माझे कार्यालय` उपक्रमात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अडगळीला पडलेल्या अभिलेख कक्षाची (रेकॉर्ड रूम) नव्याने मांडणी करण्यात आली. एका कोपऱ्यातील कक्षाच्या नव्या संसाराची मांडणी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमातून पूर्ण झाली. या वेळी कक्षामध्ये सव्वाशे वर्षापूर्वीचे अनेक प्राचीन कागदपत्र आढळली.

जिल्हाधिकारी कार्यालयात नव्या रूपात हा अद्ययावत अभिलेख कक्ष सुरू झाला आहे. पालकमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते सोमवारी (ता. 25) या कक्षाचे उदघाटन झाले. खासदार सुधाकर श्रृंगारे, आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आमदार बाबासाहेब पाटील, आमदार विक्रम काळे, आमदार धीरज देशमुख, आमदार अभिमन्यु पवार यावेळी उपस्थित होते. लातूर जिल्ह्याची निर्मिती झाल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासोबत या अभिलेख कक्षाची स्थापना झाली. लातूर जिल्ह्याशी संबंधित सर्व रेकॉर्ड उस्मानाबाद येथून येथे आणण्यात आले. तेव्हापासून हा कक्ष जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयामागील कृषी सहसंचालकांच्या कार्यालयालगत होता. कक्षाने 38 वर्ष अडगळीत काढले.

औंढ्यात माणुसकीचे घडले दर्शन; विसरलेली एक लाख दहा हजाराची सोनसाखळी केली परत 

तत्कालीन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी या कक्षाला नवीन जिल्हाधिकारी कार्यालयात स्थलांत्तरीत करण्याचा निर्णय घेतला. लॉकडाऊनच्या काळात तहसीलदार महेश परंडेकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने स्थलांत्तराचे काम केले. सर्व बस्त्यांचे विलगीकरण व फेरबांधणीचे कामकाज उपजिल्हाधिकारी जीवन देसाई यांच्या तर नवीन कक्षाची आखणी, रॅक उभारणी, डाटा संकलन व संस्करण तसेच अभिलेख कक्षाचे सुशोभीकरण व रचनेचे काम सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी महेश सावंत यांच्या पथकाने पूर्ण केले.

तब्बल 85 दिवसाच्या अथक परिश्रमातून हे काम तडीस नेण्यात आले. नवीन अद्ययावत कक्षात रेकॉर्डची सर्व माहिती संगणकाशी जोडण्यात आली. आता एका क्लिकवर जुन्या कागदपत्रांचा शोध घेणे शक्य झाल्याचे उपजिल्हाधिकारी देसाई यांनी सांगितले. उदघाटनप्रसंगी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी पालकमंत्र्यांना कक्षाची माहिती देताना सर्व तहसिल व उपविभागीय अधिकारी कार्यालयात अद्ययावत अभिलेख कक्षाची उभारणी करण्याची सूचना केली. 

प्रतिबंधक लस घेतली का? काय म्हणते तब्येत! अशी विचारपूस करत निलंगेकरांनी कोरोना...

दीड लाखाहून अधिक संचिका-
नवीन कक्षात 151 रॅक उभारले असून 22 शाखांचे 7 हजार 142 बस्ते या रॅकमध्ये बांधून ठेवण्यात आले आहेत. कक्षातील सर्व एक लाख 64 हजार 332 संचिकांची यादी संगणकीकृत करण्यात आल्याने त्यांचा शोध तातडीने होणार आहे. उदघाटनप्रसंगी निजामकालीन सन 1895, 1902, 1903 व 1913 कालावधीतील प्राचीन कागदपत्रांचे प्रदर्शन मांडण्यात आले होते. याची माहिती उपजिल्हाधिकारी देसाई यांनी दिल्यानंतर पालकमंत्री देशमुख यांनी समाधान व्यक्त करत जिल्हा प्रशासनाचे अभिनंदन केले.

(edited by-pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Latur latest news Documents found 125 years ago archives