डाॅक्टर तरुणीचा छंदच 'भारी' ; हुबेहुब करते चित्रांचं रेखाटन

विवेक पोतदार
Tuesday, 23 February 2021

सुषमाला सहावीपासून हा छंद जडला आहे. अनेक नेते, अभिनेत्यांची हुबेहूब चित्रे ती काढते. तब्बल दोनशेपेक्षा जास्त चित्रांचे रेखाटन आतापर्यंत तिने केले आहे.

जळकोट,(जि.लातूर): कोणत्याही क्षेत्रात राहून आपला छंद जोपासणारी माणसे ध्येयवेडी असतात. एकीकडे मोठ्या परिश्रमाने वैद्यकीय शिक्षण घेत दुसरीकडे चित्रकलेचा छंद जोपासणाऱ्या डाॅ. सुषमा अजिंक्य भोपळे (फुले) यांचा आदर्श इतरांसाठी प्रेरणादायी असाच आहे. पेन्सिलीने सुंदर चित्र रेखाटन करत सर्वांचे लक्ष वेधून घेणाऱ्या सुषमाचे  वडील उमरगा रेतु  (ता.जळकोट)  येथे जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक आहेत.

डाॅ.सुषमा भोपळे ही सध्या एम.बी.बी.एस.नंतर पीजी करत असून नुकताच तिचा विवाह झाला आहे. हा चित्रकलेचा छंद सुषमाने लहानपणापासून म्हणजे सहावीच्या वर्गापासून जडला तो आताही जोपासत आहे. सुषमा चित्रे पेन्सिलने रेखाटन करते. सुरुवातीला तिच्याकडे कुटुंबियांनी दुर्लक्ष केले. परंतु पुढे तिचे चित्र रेखाटन एवढे सुंदर दिसायला लागले की, भल्याभल्यांनाही त्याची भुरळ पडायला लागली.

उस्मानाबादचे 'मांझी'! समाजसेवेचे वेढ असणारे पंकज करतायत बोरी नदीचे...

आतापर्यंत तिने समाजसुधारक, नेते, अभिनेते, अभिनेत्री आदिंची 200 च्या वर चित्र पेन्सिलने रेखाटन केलेली आहेत. यात देवदेवतांची ज्यात गणपती, महादेव, याबरोबरच छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, नाना पाटेकर, विलासराव देशमुख, रितेश देशमुख, दीपिका पदुकोन, मधुबाला, अक्षय कुमार,आदिंचा समावेश असून चित्रे पेन्सिलने हुबेहुब, आकर्षक, मनमोहक अशी आहेत.

तिने पहिले चित्र श्रीकृष्णाचे काढले होते. त्यावेळी गुरुजींनी शाबासकीची पाठीवर मारलेली थाप प्रेरणा देणारी ठरली. असा अनुभव तिचे वडिल सुधाकर फुले सांगतात. ते उमरगा रेतु (ता.जळकोट)  येथे शिक्षक आहेत.

हिंगोलीत विनामास्क नागरिकांवर दंडात्मक कारवाई, पन्नास हजाराचा दंड वसूल

सुषमाचे प्राथमिक शिक्षण वडिलांच्या बदलीमुळे जिल्हा परिषदेच्या दिग्रस (बू) (ता.कंधार जि.नांदेड) येथील शाळेत झाले. तर लहाणपणापासूनच हुशार असल्याने स्पर्धा परिक्षेत यश मिळाल्यामुळे नवोदय विद्यालय नांदेड येथे झाले. तर बारावी राजर्षी शाहू कॉलेज लातूर येथून पूर्ण केले.तर एम बी बी एस चे शिक्षण विलासराव देशमुख शासकिय वैद्यकिय महाविद्यालयात पूर्ण केले. तर सध्या पीजी औरंगाबाद येथे करत असल्याचे वडिलांनी सांगितले.
 
वैद्यकीय क्षेत्रात शिक्षण घेत चित्रकलेचा (पेन्सिलने रेखाटन) जगावेगळा छंद जोपासणारी डाॅ.सुषमा भोपळे-फुले ही सर्वांच्या कौतुकाचा विषय ठरली आहे.

"सुषमा लहाणपणी खड्यांचा खेळ खेळताना मी तिला एक चित्रकलेची वही आणून दिली व चित्रे काढायला सांगितले. तिने सुंदर चित्र रेखाटन करायला सुरवात केली. तेंव्हापासून तिला हा छंद जडला आहे. कुठलाही कोर्स न करता शाळेत केवळ चित्रकला परीक्षा उतिर्ण आहे. अनेक चित्रांचे पेन्सिलने रेखाटन तिने सुंदरपणे केले आहे. अनेकांनी त्याचे कौतुक केले आहे. याचा मला अभिमान वाटतो" - सुधाकर फुले (वडील)

(edited by- pramod sarawale) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Latur latest news a female doctor creating great picture drawing