esakal | इथं मरणालाही जावं लागलं माघारी! २४ स्कोर असतानाही रुग्णाची कोरोनावर यशस्वी मात

बोलून बातमी शोधा

Ausa
इथं मरणालाही जावं लागलं माघारी! २४ स्कोर असतानाही रुग्णाची कोरोनावर यशस्वी मात
sakal_logo
By
जलील पठाण.

औसा (लातूर): लढाऊ वृत्ती आणि त्याला मिळालेल्या लक्ष्मणा सारख्या भावाची साथ आणि कशाचीही पर्वा न करता डॉक्टरांनी केलेले प्रयत्न यामुळे औसा येथील एका व्यक्तीने मरणाच्या दारातुन माघारी प्रवास केला आहे. छातीच्या स्कॅनचे रिपोर्ट स्कोर पंचवीस पैकी चोवीस आले असताना आणि नव्वद टक्के फुफुसाने काम थांबविले असतानाही त्या झुंजार योद्धयाने अक्षरशः मरणाला आल्या पावली परत पाठविले आहे. वाचण्याची शक्यता धूसर असतांनाही डॉक्टरांनी रुग्णावर केलेले उपचार आणि रुग्णाची मानसिकता थोडीही ढळू न देणाऱ्या भावाचे प्रयत्न कामी आल्याचे बोलले जात आहे.

औसा शहरातील पण सध्या नोकरीच्या निमित्ताने पुणे येथे राहत असलेले भीमाशंकर मन्मथप्पा स्वामी यांना पुण्यातच ८ एप्रिलला कोरोनाने गाठले. त्यांच्या बरोबर पत्नीही पॉझिटिव्ह आली. पुण्यात कुठेच बेड मिळत नसल्याने त्यांचे भाऊ शिवशंकर स्वामी यांनी त्यांना ९ एप्रिल रोजी लातूरला आणले. त्यांच्या छतीचा स्कॅन काढल्यावर कळाले की, कोरोनाने पंचवीस पैकी चोवीस टक्के फुफ्फूस संक्रमित केले आहे. तातडीने त्यांना लातूर येथील शीतल पाटील यांच्या व्यंकटेश हॉस्पिटलमध्ये भरती केले.

हेही वाचा: हृदयद्रावक! मुलाच्या मृत्यूनंतर वृद्ध आई-वडीलांनाही सोडले प्राण

रिपोर्ट पाहिल्यावर डॉ. पाटील यांनाही रुग्ण वाचण्याची खात्री नव्हती. मात्र त्यांनी रूग्णासह नातेवाईकांना धीर दिला आणि उपचार सुरू केले. दोन दिवस डॉक्टरांनाही यश येत नव्हते. या काळात रुग्णाचा भाऊ शिवशंकर हे सावलीसारखे रुग्णाजवळ होते. एरवी कोरोना रुग्णाच्या जवळ कोणी थांबायला सहसा भीती वाटते मात्र शिवशंकर भावाजवळच बसून होते. त्यांना स्वतः बद्दल जराही भीती वाटत नव्हती. त्यांना त्यांच्या भावाला मृत्यूच्या दाढेतून बाहेर आणायचे होते.

वहिनी आणि भाऊ दोघेही संक्रमित असतांना त्यांनी भावाला धीर दिला. मी आहे तू अजिबात काळजी करू नकोस असा विश्वास दिला. तिसऱ्या दिवशी त्यांना अराम वाटू लागला. वहिनींना १४ तारखेला डिस्चार्ज मिळाला. आणि भावालाही मग १७ तारखेला घरी पाठविण्यात आले. त्यांचा स्कोर आता शून्यावर आला असून नव्वद टक्के फुफुस काम करीत आहे.

हेही वाचा: Corona Updates: मराठवाड्यात २४ तासांत आठ हजार रुग्ण; १७३ जणांचा मृत्यू

माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी डॉक्टर शीतल पाटील देवदूत आहेत. त्यांनी जातीने आणि काळजीपूर्वक उपचार आणि धीर दिल्यानेच माझा भाऊ आज मरणाच्या दारातून परत आला आहे. आशा काळात नातलग आणि जवळच्या मित्रांनी रुग्णाला जो मानसिक आधार दिला तोच त्याला वाचविणारा ठरला आहे. रुग्णाच्या मनातली भीती ही त्या अजारापेक्षा जास्त घातक असून सर्वांनी आशा रुग्णांना मानसिक आधार देणे गरजेचे असल्याचे शिवशंकर स्वामी यांनी सांगितले.