
मागील दोन वर्षांपासून श्री. ढगे यांनी शेती करण्याची पद्धत बदलून टाकली आहे
उदगीर (लातूर): ‘कष्ट केल्याने माळरानावरही सोने पिकते’ ही म्हण हेर (ता. उदगीर) येथील शेषराव ढगे या शेतकऱ्याने खरी करून दाखविली आहे. माळरानावर कोणतेही रासायनिक खते व औषधांचा वापर न करता त्यांनी जैविक पद्धतीने भाजीपाला शेती केली आहे. यातून मोठे उत्पन्नही त्यांना मिळाले.
ग्रामीण भागातील शेतकरी पारंपरिक शेती ऐवजी कालानुरूप सुधारित शेतीकडे वळणे गरजेचे आहे. यानुसार हेर येथील अल्पभूधारक शेतकरी शेषराव ढगे यांनी कमी जागेत भाजीपाला पीक घेऊन जास्त उत्पन्न काढण्याची क्रांती करून दाखवली आहे. भाजीपाला शेतीकडे अगोदर पारंपरिक पिकाच्या माध्यमातून एक हेक्टर क्षेत्रावर वर्षाकाठी एक ते दीड लाख रुपयांचे उत्पन्न त्यांना मिळत होते. परंतु, मागील दोन वर्षांपासून श्री. ढगे यांनी शेती करण्याची पद्धत बदलून टाकली.
परभणी जिल्हा रुग्णालयातील आगीतून संशयाचा धुर , बारा तासात दुसरी घटना
माळरानावर भाजीपाला पिकाची लागवड करणे सुरू केले. यंदा पाच गुंठे मटकी, दहा गुंठे कांदा, दोन गुंठे मेथी, दहा गुंठे कोथिंबीर लागवड करून त्यातून ५० हजार रुपये उत्पन्न काढले. याच ठिकाणी चार गुंठे मिरची लागवड केली असून, तीही जोमाने आली आहे. शिवाय २५ हजार रुपयांचे आजवर यातून उत्पन्न मिळाले आहे.
या बरोबरच दोन गुंठे लसूण, ३० गुंठे भुईमूग, ३० गुंठे पानकोबी, तीस गुंठे पपई यातून जवळपास दीड लाख रुपयांचे उत्पन्न मिळणे त्यांना अपेक्षित आहे. सध्या बाजारभावही चांगला आहे. जैविक पद्धतीने पिकवलेली दीड एकर तुरही बहारदार आली होती. यातून ८ ते १० क्विंटल उत्पादन निघाले.
कलिंगड लागवडीच्या उत्पन्नातून साधला आर्थिक आधार; हयातनगर येथील शेतकऱ्याचा उपक्रम
जैविक पद्धत यशाची गुरुकिल्ली-
ढगे यांनी रासायनिक पद्धतीला फाटा देत शेणखत, गूळ, गोमूत्र, हरभरा पीठ, गंधक यांचे मिश्रण केले आहे. प्रत्येक झाडाच्या बुडाला अर्धा लीटर मिश्रण दर पंधरा दिवसाला ते देतात. यातून उत्पन्नात मोठी वाढ झाल्याचे श्री. ढगे यांनी सांगितले. जैविक पद्धत आपल्या यशाची गुरुकिल्ली असल्याचेही ते म्हणाले. शेषराव ढगे यांची भाजीपाला शेती पाहण्यासाठी हेर व परिसरातील शेतकऱ्यांची गर्दी होताना दिसत आहे. जैविक पद्धतीने शेतकऱ्यांनी शेती करण्यास सुरुवात करावी, असे श्री. ढगे यांनी सांगितले.
(edited by- pramod sarawale)