लातूरमध्ये नऊ प्रभागांच्या रचनेत बदल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Latur municipal election

लातूरमध्ये नऊ प्रभागांच्या रचनेत बदल

लातूर : लातूर महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार प्रभाग रचना तयार करण्यात आली होती. यावर आक्षेप व हरकतीही मागवण्यात आल्या होत्या. या हरकतीवर सुनावणीही झाली होती. याच्या शिफारसी राज्य निवडणूक आयोगाला सादर करण्यात आल्या होत्या. यानुसार राज्य निवडणूक आयोगाने अंतिम प्रभाग रचना जाहिर केली आहे. यात एकूण २७ प्रभागापैकी नऊ प्रभागात काही बदल झाले आहेत. यात प्रामुख्याने दलित वस्त्यांचा भाग तुटणार नाही याची काळजी या प्रभाग रचनेत घेण्यात आली आहे.

महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी २७ प्रभाग असणार आहेत. यातून ८१ सदस्य निवडले जाणार आहेत. प्रत्येक प्रभागात तीन सदस्य असणार आहेत. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार महापालिकेने प्रभाग रचना जाहिर करण्यात आली होती. यावर आक्षेप व हरकती मागवण्यात आल्या होत्या. या आलेल्या ३४ हरकतीवर ता. दोन जुलै रोजी महापालिकेत सुनावणी झाली आहे. या प्रभाग रचनेवर आलेल्या आक्षेप व हरकतीवर सुनावणी घेण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने पणन मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक दीपक तावरे, महापालिकेचे आयुक्त अमन मित्तल, विभागीय आयुक्तांचे प्रतिनिधी म्हणून विभागीय आयुक्त कार्यालयातील उपायुक्त वामन कदम तसेच राज्य निवडणूक आयोगाचे प्रतिनिधी देखील यावेळी उपस्थितीत होते.

यावेळी आर्वी आणि काशीलिंगेश्वर या दोन गावातील भाग प्रभाग रचनेतून वगळण्यात यावा हा सर्वात महत्वाचा आक्षेप होता. पण या गावच्या हद्दीतील काही भाग हा महापालिकेच्या हद्दीच येत असल्याने हा आक्षेप फेटाळल्याचे दिसून येत आहे. प्रारुप प्रभाग रचनेत अनेक प्रभागात दलित वस्त्यांचा भाग तोडण्यात आला होता. त्यावरही आक्षेप घेण्यात आले होते. यातील काही आक्षेप समितीने मान्य केल्याचे दिसत आहे.

तशी शिफारसीचा अहवाल या समितीने राज्य निवडणूक आयोगाला सादर केली होता. यानुसार दोन, सहा, सात, बारा, अठरा, एकोणीस, तेवीस, चोवीस आणि २६ या प्रभागाच्या हद्दीत काहीसे बदल झाले आहेत. त्यामुळे या प्रभागातील एकूण लोकसंख्या, अनुसूचित जाती व जमातीच्या लोकसंख्येतही फरक पडला आहे. इतर प्रभागाची रचना मात्र तशीच कायम राहिली आहे. अंतिम प्रभाग रचना जाहिर झाल्यामुळे अनेक मात्तबरांना आता नवीन प्रभाग शोधावे लागणार आहेत.

प्रारूप रचनेतील हरकती व आक्षेपावर सुनावणी घेऊन त्याचा अहवाल राज्य निवडणूक आयोगाला सादर करण्यात आला होता. आता अंतिम प्रभाग रचना जाहिर झाली आहे. यात दोन, सहा, सात, बारा, अठरा, एकोणीस, तेवीस, चोवीस आणि २६ या प्रभागाच्या हद्दीत बदल झाले आहेत. त्याची व्याप्ती, हद्दीचे वर्णन यातही थोडा बदल झाला आहे. दलित वस्त्यांचा भाग तुटणार नाही, याची काळजी घेण्यात आली आहे.

- अमन मित्तल, आयुक्त, महापालिका, लातूर

Web Title: Latur Municipal Election Final Changes In Nine Wards Structure

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top