
लातूर : शाळेत प्रवेश घेतलेल्यांची मिरवणूक
लातूर : जिल्ह्यातील जिल्हा परिषदेची पहिली सेमी इंग्रजी शाळा म्हणून नावलौकिकास आलेल्या मुरूड येथील पारूनगर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत बुधवारी पहिल्याच दिवशी सुमारे ५२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. या विद्यार्थ्यांची खास रथातून मिरवणुक काढण्यात आली. शिक्षण उपसंचालक डॉ. गणपत मोरे व मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी मिरवणुकीत सहभागी होत विद्यार्थ्यांचे स्वागत केले. नवीन विद्यार्थ्यांसह शाळेतील पहिली ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची संख्या ९०९ पर्यंत पोहचली असून पहिल्या दिवशी सातशे विद्यार्थ्यांनी शाळेत हजेरी लावली.कोरोनानंतर तब्बल दोन वर्षानी शाळा शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी सुरू झाल्या.
यामुळे विद्यार्थ्यांच्या स्वागताची जय्यत तयारी जिल्हा परिषद शाळांतून करण्यात आली होती. खासगी शाळा तसेच मोठ्या बॅनरखाली नव्याने सुरू होत असलेल्या सीबीएसई व अन्य माध्यमांच्या शाळांमुळे जिल्हा परिषद शाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठी पालक उत्सुक नाहीत. मात्र, मुरूड येथील पारूनगर शाळा यासाठी पू्र्वीपासून अपवाद आहे. सुरूवातीपासूनच जिल्हा परिषदेचे माजी सदस्य दिलीप नाडे यांनी दिलेले योगदान तसेच शाळेतील शिक्षकांमुळे विद्यार्थ्यांची संख्या दरवर्षी वाढत गेली. सन २००४ मध्ये चोवीस विद्यार्थी संख्येने सुरू झालेल्या या शाळेची पंधरा वर्षात हजाराच्या पुढे गेली आहे.
एवढी मोठी विद्यार्थी संख्या असलेली जिल्ह्यातील जिल्हा परिषदेची एकमेव शाळा आहे. मागील काही वर्षात या शाळेचे चाळीसहून अधिक विद्यार्थी नवोदय विद्यालयाच्या प्रवेशासाठी पात्र ठरले असून शेकडो विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झाले आहेत. शाळेतून शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी सध्या वैद्यकीय व अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत आहेत. यामुळेच शाळेत प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी व पालकांची गर्दी असते. यंदाही पहिल्याच दिवशी शाळेत ५२ विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी नोंदणी केली. या विद्यार्थ्यांचे खास स्वागत करण्याचे नियोजन दिलीप नाडे व सरपंच अभयसिंह नाडे यांनी शालेय व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून केले. यातूनच या विद्यार्थ्यांची बुधवारी रथातून वाजतगाजत मिरवणुक काढण्यात आली. मिरवणुकीत गोयल व डॉ. मोरे यांच्यासह गटशिक्षणाधिकारी संजय पंचगल्ले, उपसरपंच आकाश कणसे, मुख्याध्यापिका छाया कांबळे यांच्यासह शिक्षक, पालक व ग्रामस्थ सहभागी झाले होते. या वेळी विद्यार्थ्यांना पुस्तक व गणवेशाचे वाटप करण्यात आले.
कोरोनाची लाट ओसरल्यानंतर यावर्षी पहिल्यांदाच शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी शाळा उत्साहात सुरू झाल्या. काही दिवसापासून प्रवेशोत्सवाचे नियोजन करण्यात आले होते. त्यापूर्वी प्रवेशपात्र विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण करून या विद्यार्थ्यांच्या शाळा प्रवेशासाठी प्रयत्न झाले. बाला उपक्रमामुळे जिल्हा परिषद शाळांच्या इमारतींचा कायापालट झाला असून पालकांचेही शाळेसोबत नवे नाते निर्माण झाले आहे. यामुळेच कोरोनानंतर सुरू झालेल्या शाळांमध्ये आलेल्या विद्यार्थ्यांत मोठा उत्साह व आनंद दिसून आला.
- अभिनव गोयल, मुख्य कार्यकारी अधिकारी, लातूर.
Web Title: Latur Murud Procession Of School Admission Students
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..