हरणाच्या पाडसाला जीवदान! गावकऱ्यांची तत्परता

उध्दव दुवे
Thursday, 14 January 2021

विहिरीमध्ये हरिणाचे पिल्लू (पाडस) जिवाच्या आकांताने तडफडत होते. एक तर विहीर खोल आणि पाणी असल्याने मदत कार्यात अडथळा येत होता.

आटोळा ( लातूर): येथील सरपंचांनी तत्परता दाखवत गावकऱ्यांच्या मदतीने  विहिरीत पडलेल्या हरिणाच्या पाडसाचे प्राण वाचवले आहेत. येथील शेतकरी प्रल्हाद कलवले यांच्या विहिरीमध्ये हरणाचे पाडस पडले असल्याची माहिती ग्रामस्थ अरमान मुंजेवार यांनी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास  सरपंच सौ. रेणूका हावगीराव तोडकरी यांना दिली होती.

सरपंचानी तात्काळ या घटनेबाबत वन विभागाचे क्षेत्र रक्षक गोविंद माळी यांना कळविले. माळी यांनी वनविभागाचे कर्मचारी पाठवित असल्याचे सांगितले पण त्यांची वाट न पाहता, पोलीस पाटील गणेश फुलारी आणि गावातील ग्रामस्थांना घेऊन विहिरीकडे धाव घेतली. विहिरीमध्ये हरिणाचे पिल्लू (पाडस) जिवाच्या आकांताने तडफडत होते. एक तर विहीर खोल आणि पाणी असल्याने मदत कार्यात अडथळा येत होता.

उदगीर तालुक्यातील तब्बल 48 मतदान केंद्र संवेदनशील घोषित

एवढ्यात वन विभागाचे कर्मचारी वनसेवक उद्धव देगणुरे घटनास्थळी हजर झाले व सोमनाथ गंगापुरे यांना सोबत घेऊन ते दोघे विहिरीमध्ये उतरले. पाडसाला दोरीने बांधून ग्रामस्थांच्या मदतीने विहिरीतून वर काढले. तीन - चार महिन्यापूर्वी असेच एक काळवीट महेताब उजेडे यांच्या विहिरीत (ता. ३) सप्टेंबर रोजी पडले होते. त्या वेळेसही गावकऱ्यांनी त्यास जीवनदान दिले होते.

या कामी गावातील नागरिक हावगीराव तोडकरी, संतोष कलवले, बीभीषण पांचाळ, प्रकाश बावगे, गंगाराम हाने, गणी दरोगे, निजाम पटेल, शिवा रावळे, चंद्रकांत पांचाळ, प्रमोद शिंदे, मोहन कलवले, धनाजी कलवले, प्रल्हाद कलवले आणि वैजनाथ धोंडापुरे  या सर्वांच्या मदतीने हरिणाच्या पाडसाचे प्राण वाचविण्यात यश आले आहे.

(edited by- pramod sarawale)

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: latur news Save the life of deer villagers saved life