
औसा (लातूर): औसा पालिकेवर सर्वाधिक काळ नगराध्यक्ष म्हणून राहिलेले कै. मुजबोद्दीन पटेल यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेतल्यावर गेल्या वीस वर्षांपासून औसा पालिकेचे राजकारण विद्यमान नगराध्यक्ष अफसर शेख, माजी नगराध्यक्ष किरण उटगे व माजी नगराध्यक्ष सुनील मिटकरी यांच्या सभोवताली फिरत असल्याचे पाहायला मिळते. आगामी पालिका निवडणुकीतही या तिघांची भूमिका महत्वाची ठरणार आहे.
गेल्या निवडणुकीत हे तीनही जण एकमेकांच्या विरोधात लढल्याने मतविभाजनाचा फायदा डॉ. अफसर शेख यांना होऊन ते स्वतः जनतेतून नगराध्यक्षपदी तर त्यांचे बारा नगरसेवक निवडून आले. या मतविभाजनाचा अभ्यास करून किरण उटगे आणि सुनील मिटकरी यांच्या पुढाकाराने शहर विकास आघाडीचे संकेत मिळत आहेत. नगराध्यक्ष डॉ. अफसर शेख यांच्या विरोधात राजकीय वातावरण तापले असताना आघाडीला जर लातूर आणि निलंग्याचे बळ मिळाले तर औसा पालिकेत सत्ता परिवर्तनाचा चमत्कार पाहायला मिळू शकतो.
मुजबोद्दीन पटेल यांच्या कार्यकाळानंतर भाजपचे किरण उटगे यांनी जनतेतून निवडून येत औशाच्या पहिल्या टप्प्यातील रस्ता रुंदीकरणाचा प्रश्न निकाली काढला. सत्तेत विरोधी पक्षाचे सरकार असताना सुद्धा त्यांनी तत्कालीन मंत्री दिलीपराव देशमुख यांच्याकडून भरघोस निधी उपलब्ध करून घेतला. रस्ता रुंदीकरणाचा विषय जेव्हां पण निघतो त्यावेळी किरण उटगे यांचे नाव औसेकर घेतातच. त्यानंतर सव्वा वर्षाच्या आपल्या कार्यकाळात सुनील मिटकरी यांनी औशाच्या पाणी प्रश्नावर कायमचा तोडगा काढण्यासाठी सभागृहात माकणी धरणातील आठ टीएमसी पाणी आरक्षणाचा ठराव मंजूर करीत तसा प्रस्ताव शासनाकडे पाठविला होता. त्यानंतर मागासवर्गीय महिलेचे आरक्षण असलेल्या जागेवर त्या महिलेला रजेवर पाठवून नगराध्यक्ष पद डॉ. अफसर शेख यांच्याकडे देत तत्कालीन आमदार बसवराज पाटलांनी सुवर्णमध्य साधला होता.
२०१५ च्या निवडणुकीत अफसर शेख यांनी किरण उटगे, सुनिल मिटकरी आणि सेनेचे सुरेश भुरे यांच्यात झालेल्या मतविभाजनाचा पुरेपूर फायदा घेत पालिकेवर नागराध्यक्षसह बारा नगरसेवक निवडून आणून एक हाती सत्ता स्थापन केली. यांच्याही कार्यकाळात औसा शहराने कात टाकली. माकणी पाणी पुरवठा योजनेला पूर्णत्वास नेण्यासाठी विशेष प्रयत्न त्यांनी केले. तलाव संवर्धन, मराठा भवन, वारकरी भवन आणि विशेष म्हणजे शहराची ऐतिहासिक हद्दवाढ पक्षाच्या नेत्याकडे आपले वजन वापरात मंजूर करून घेतली.
त्याचबरोबर सत्येचे विकेंद्रीकरण करीत विविध समाजाला नगराध्यक्ष पद व उपनागराध्यक्षपदी संधी देत सोशल इंजिनिअरिंग केले. वरील तीनही लोकांनी औसा शहरासाठी भरीव योगदान दिल्याने आता येणाऱ्या निवडणुकीत जर किरण उटगे व सुनील मिटकरी यांनी शहर विकास आघाडीच्या माध्यमातून आपले राजकीय वारू सोडले तर औशात सत्ता परिवर्तनाचा चमत्कार घडेल असे बोलले जात आहे. या तिघांची भूमिका आगामी निवडणुकीत निर्णायक ठरणार असल्याने औशाच्या राजकारणातला हा त्रिकोण सध्या चर्चेचा विषय होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.