स्वतःचं मानधन आणि पिकविम्याच्या रक्कमेतून केली बसस्थानकातील प्रवाशांसाठी पाण्याची सोय

विकास गाढवे
Thursday, 28 January 2021

कलाशिक्षक पाटील यांच्याकडून मुरूडच्या बसस्थानकात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आहे

मुरूड (जि.लातूर) : येथील जनता विद्यामंदिरचे कलाशिक्षक व सामाजिक कार्यकर्ते प्रवीण पाटील यांनी स्वतःचा पहिल्यांदा आणि शेवटचा वाढदिवस साजरा करताना नवा पायंडा पाडला. एनसीसी अधिकारी म्हणून मिळालेले मानधन आणि पिकविम्याची रक्कम त्यांनी येथील बसस्थानकातील प्रवाशांसाठी पाण्याची व्यवस्था करण्यात खर्ची घातली. एक लाखाहून अधिक खर्च करत त्यांनी पाण्याच्या व्यवस्थेसह बसस्थानक परिसरात वृक्षलागवड करून त्यांच्या संवर्धनासाठी ठिबक सिंचन संच बसवला. यामुळे अनेक वर्षानंतर बसस्थानकातील प्रवाशांना पिण्याचे पाणी उपलब्ध झाले आहे.

 सहकारमहर्षी शिवाजीराव नाडे सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष व क्षेत्र विकास समितीचे सचिव असलेले पाटील हे गेल्या काही वर्षापासून गावात विविध सामाजिक उपक्रम राबवतात. वृक्षलागवड व संवर्धनात त्यांचे मोठे योगदान आहे. बसस्थानकात अनेक वर्षापासून प्रवाशांना पिण्याचे पाणी उपलब्ध नव्हते. श्री. पाटील यांनी त्यासाठी तयारी दाखवली. जनता विद्यामंदिरमध्ये ते एनसीसी अधिकारीही आहेत. त्याचे मानधन व पिकविम्याची रक्कम त्यांनी यासाठी खर्च करण्याचा निर्णय घेतला.

महाविकास आघाडीची चाल आमदार राणा पाटलांवर 'भारी'; नगरपालिका निवडणुकीत...

यातूनच 21 जानेवारी स्वतःचा पहिल्यांदा आणि शेवटचा जाहीर वाढदिवस साजरा करण्याचे त्यांनी ठरवले. स्वखर्चाने विंधनविहिर खोदून त्यावर पंप व पाण्याची टाकी बसवली. यासोबत बसस्थानक परिसरात 42 वृक्षांची लागवड करून त्यासाठी ठिबकची व्यवस्था केली. यासाठी एसटी महामंडळानेही योगदान दिले. याचे लोकार्पण जिल्हा परिषद सदस्य दिलिपदादा नाडे यांच्या हस्ते झाले. रूरल एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष यशवंतराव नाडे अध्यक्षस्थानी होते. विभाग नियंत्रक सचिन क्षिरसागर, भाजपचे कार्यकर्ते हनुमंत नागटिळक, वाहतूक नियंत्रक जाफर कुरेशी व बी. एच. देवकर यांच्यासह पदाधिकारी व ग्रामस्थ या वेळी उपस्थित होते. सर्वांनीच श्री. पाटील यांच्या योगदानाचे कौतुक केले.

विषय समितीच्या सभापती निवडीदरम्यान सत्ताधारी आणि विरोधक एकत्र

रक्तदान करून कार्याला सलाम
श्री. पाटील यांनी वाढदिवसानिमित्त बसस्थानकातच रक्तदान शिबीराचे आयोजन केले. यात 45 जणांनी रक्तदान करून पाटील यांच्या कार्याला सलाम केला. काही लक्षणांमुळे 17 जणांना रक्तदान करता आले नाही. पाटील यांचा विविध संस्था व ग्रामस्थांनी सत्कार केला. पाटील यांनी ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप केले. ग्रामपंचायतीच्या अभ्यासिकेला 42 पुस्तके भेट दिली. गरजूंना ब्लॅंकेट वापट करून नरसिंह चौकात सिमेंटचे बाक बसवले. या वेळी गणेश सापसोड, विशाल शिंदे, संतोष नाडे, सौरभ शिंदे, योगेश पुदाले, शिवाजी चिकरुडकर, महादेव मस्के, रामदास शिंदे व विद्यार्थी उपस्थित होते.

(edited by- pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Latur news water for the passengers the bus stand