लातूरच्या पिटलाईनसाठी १४ कोटी द्या, खासदार शृंगारेंची रेल्वेमंत्र्यांकडे मागणी

1railway_35
1railway_35

लातूर : लातूर लोकसभा मतदारसंघात रेल्वेसेवा अधिक विस्तारावी, रखडलेले प्रकल्प व कामे मार्गी लागावेत यासाठी खासदार सुधाकर शृंगारे यांनी पुढाकार घेतला आहे. रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी घेतलेल्या व्हीडीओ कॉन्फ्रन्सिंगच्या माध्यमातून त्यांनी लातूर जिल्हा तसेच लातूर लोकसभा मतदारसंघातील रेल्वेसंबधीचे प्रश्न व मागण्या रेल्वेमंत्र्यांसमोर त्यांनी मांडल्या आहेत. लातूरच्या पिटलाईनसाठी मंजूर झालेले १४ कोटी रुपये तातडीने उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणीही श्री. शृंगारे यांनी रेल्वेमंत्र्यांकडे केली आहे. लातूर जिल्ह्यातील रेल्वेच्या प्रश्नावर रेल्वेमंत्री सकारात्मक असल्याची माहिती खासदार शृंगारे यांनी दिली.

या कॉन्फ्रनसिंगमध्ये त्यांनी लातूर लोकसभा क्षेत्रात नवीन रेल्वे व रेल्वेविषयक कामे व प्रलंबित कामे यांची विस्ताराने माहिती दिली आहे. लातूरच्या पिटलाईनसाठी मंजूर झालेले १४ कोटी लवकरात लवकर मिळावेत. पिटलाईनचे काम लवकर झाले तर येथून नवीन रेल्वे गाड्या सुरु करता येणे शक्य आहे, याकडे श्री.शृंगारे यांनी रेल्वेमंत्र्यांचे लक्ष वेधले. तिरुपती लातूर तिरुपती मार्ग नवीन रेल्वे गुंटकल, वाडी, मंञालय रोड, गाणगापूर, गुलबर्गा, हुमनाबाद, बीदर उदगीर मार्गे सुरु करण्यात यावी. यामुळे लातूरकरांची अनेक वर्षांपासूनची मागणी मार्गी लागेल.

मुंबईला जाणाऱ्या व्यापारी, प्रवाशांची गैरसोय थांबविण्यासाठी लातूर ते मुंबई नवीन एक रेल्वे सुरु करण्यात यावी व रोज सुरु असलेल्या रेल्वेला साधारण डब्यांची संख्या वाढवावी, नवीन हैदराबाद-मुंबई, बिदर-मुंबई व परळी-तिरुपती या नवीन रेल्वेची मागणी लातूरच्या जनतेतून होत आहे. या तात्काळ सुरु करण्यासाठी प्रयत्न करावेत. लातूररोड-जळकोट-बोधन रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण दक्षिण मध्य रेल्वेकडून करण्यात आले आहे. १३५ किलोमीटरसाठी दोन हजार ४०९ कोटी रुपयांचा निधी लागणार आहे. हे काम लवकर सुरु करावे, अशी मागणीही त्यांनी या बैठकीत केली आहे.

दोन वर्षांपासून प्रलंबित असेलेल्या लातूर रोड-अहमदपूर-लोहा-नांदेड रेल्वे मार्गास लवकर मंजूरी देऊन कामास सुरवात करावी. त्यामुळे लातूर लोकसभा मतदारसंघातील प्रश्न सुटेल. वडवळ नागनाथ येथील रेल्वे स्थानकावर एटीव्हीएमव्दारा तिकीटांची सुविधा उपलब्ध करुन द्यावी व प्लाटफॉर्मची उंची वाढवावी. रेल्वे क्राँसिंग व लूपलाईनसाठी ५ कोटी रुपये मंजूर असून काम अद्याप सुरु झालेले नाही ते लवकर सुरु करावे. जानवळ येथील रेल्वेगेट २०१० पासून बंद असून तेथे आरयुबी[ अंडर ग्राऊंड ब्रीज करणे आवश्यक आहे असल्याचे श्री. शृंगारे यांनी यावेळी सांगितले.

तिरुपतीसाठी आग्रह
लातूरातून मोठ्या संख्येने भाविक तिरुपतीला जातात. तथापि या शहरातून थेट तिरुपतीस जाण्यासाठी रेल्वेचे सुविधा नाही. ही रेल्वे सुरू व्हावी अशी लातूरकरांची जुनी मागणी आहे. ती सुरू झाल्यास लातुरकरांची सोय होऊन रेल्वेला चांगला महसूलही मिळणार आहे. त्यामुळे लातुरसाठी विशेष बाब म्हणून ही रेल्वे सुरू करावी अशी आग्रही मागणी यावेळी खासदार शृंगारे यांनी रेल्वेमंत्र्यांकडे केली आहे.


संपादन - गणेश पिटेकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com