लातूर ः अधिकाऱ्यांच्या तुटवड्याने "रजिस्ट्री'चे काम ठप्प

विकास गाढवे
गुरुवार, 21 नोव्हेंबर 2019

राज्य सरकारच्या तिजोरीत दरवर्षी दीडशे कोटींहून अधिक महसूल टाकणाऱ्या जिल्ह्याच्या मुद्रांक व नोंदणी विभागात सध्या मनुष्यबळाचा तुटवडा जाणवत आहे. विभागातील अधिकारी मराठवाड्यात येण्यास उत्सुक नसल्याने बिकट स्थिती निर्माण झाली असून पाच कार्यालयांतील प्रमुख अधिकाऱ्यांचे पदे रिक्त असल्याने नोंदणीचे (रजिस्ट्री) कामकाज ठप्प झाले आहे. 

लातूर : राज्य सरकारच्या तिजोरीत दरवर्षी दीडशे कोटींहून अधिक महसूल टाकणाऱ्या जिल्ह्याच्या मुद्रांक व नोंदणी विभागात सध्या मनुष्यबळाचा तुटवडा जाणवत आहे. विभागातील अधिकारी मराठवाड्यात येण्यास उत्सुक नसल्याने बिकट स्थिती निर्माण झाली असून पाच कार्यालयांतील प्रमुख अधिकाऱ्यांचे पदे रिक्त असल्याने नोंदणीचे (रजिस्ट्री) कामकाज ठप्प झाले आहे. या कार्यालयात रजिस्ट्रीसाठी नागरिकांना अधिकारी येण्याची प्रतीक्षा करावी लागत असून, काही ठिकाणी अधिकारी आल्यानंतरच बंद कार्यालय व कार्यालयाचे कामकाज सुरू होत असल्याचे चित्र आहे. 

मुद्रांक व नोंदणी विभागाची जिल्ह्यात बारा दुय्यम निबंधक (रजिस्ट्री) कार्यालये आहेत. यातील प्रमुख कार्यालय असलेल्या लातुरातील क्रमांक एकच्या कार्यालयाला काही महिन्यांपासून वाली नाही. कार्यालयातील वर्ग दोनचे सहदुय्यम निबंधक पद रिक्त असून, महिन्याला पदभार बदलून वरिष्ठ लिपिक कामकाज सांभाळत आहेत. या कार्यालयात नोंदणी पद्धतीने विवाह व तालुक्‍यातील दस्त नोंदणीचे काम होते. यासोबत रेणापूर, मुरूड, शिरूर अनंतपाळ व देवणी येथील दुय्यम निबंधकांची पदे रिक्त आहेत.

या चार कार्यालयांत प्रभारी म्हणून लिपिक कर्मचारी काम पाहत आहेत. हे कर्मचारी लातूर येथील त्यांच्या कार्यालयातील कामकाज पूर्ण करून कार्यालयात येतात. तोपर्यंत लोकांना रजिस्ट्रीसाठी प्रतीक्षा करावी लागते. अधिकारी आल्यानंतर इंटरनेट सेवा बंद नसेल तर रजिस्ट्रीचे काम तडीस जाते. इंटरनेट बंद असल्यास रजिस्ट्री होत नाही व अनेकदा ठरलेले व्यवहार बारगळतात. याचा फटका लोकांना सहन करावा लागत असून, काही ठिकाणी त्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. लातूर क्रमांक दोन कार्यालयात जादा उत्पन्नामुळे कधीही अधिकारी व कर्मचाऱ्यांचा तुडवडा जाणवत नाही. 

प्रमुख अधिकारीही प्रभारी 
विभागाचे येथे नोंदणी उपमहानिरीक्षक तथा मुद्रांक उपनियंत्रक हे विभागीय कार्यालय असून, त्याअंतर्गत लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी व हिंगोली हे पाच जिल्हे येतात. या कार्यालयातील नोंदणी उपमहानिरीक्षकांचे पद गेली कित्येक वर्षे रिक्त आहे. पूर्वाश्रमीचे येथील सह जिल्हा निबंधक व सध्या नांदेड येथे कार्यरत विजय बोराळकर या पदावर प्रभारी म्हणून काम करीत आहेत. सह जिल्हा निबंधक डी. जे. माईनकर यांच्याकडेही उस्मानाबाद जिल्ह्याचा पदभार आहे. स्वतःचे कामकाज सांभाळून अतिरिक्त पदभार सांभाळताना दोन्ही अधिकाऱ्यांची कसरत होत आहे. त्यात रिक्त पदांमुळे कार्यालयाचे कामकाज सुरू ठेवताना त्यांची तारांबळ उडत आहे. 

दीडशे कोटीहून अधिक महसूल 
जिल्ह्यातून नोंदणी (रजिस्ट्री) व मुद्रांक विक्रीतून दरवर्षी दीडशे कोटीहून अधिक महसूल सरकारला मिळत आहे. गेल्यावर्षी जिल्ह्याने उद्दिष्टाहून अधिक महसूल सरकारला दिला आहे. चालू आर्थिक वर्षासाठी जिल्ह्याला 167 कोटी महसुलाचे उद्दिष्ट असून, आतापर्यंत 78 कोटी रुपयांचा महसूल सरकारजमा झाला आहे. या स्थितीत विभागातील अनेक पदे रिक्त असून, त्यात नोंदणी उपमहानिरीक्षकांसह मूल्यांकन दुय्यम निबंधक, सहायक नगररचनाकार व लिपिकांचीही पदे रिक्त आहेत. रिक्त पदे भरण्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचे श्री. बोराळकर व श्री. माईनकर यांनी सांगितले. 

मुरूडचे कार्यालय नावालाच 
लातूर तालुक्‍याच्या पश्‍चिम भागातील लोकांच्या सोयीसाठी मुरूड (ता. लातूर) येथे स्वतंत्र रजिस्ट्री कार्यालय सुरू करण्यात आले. या कार्यालयात तालुक्‍यातील 67 गावांतील रजिस्ट्रीचे व्यवहार सुरू होते. विभागातील तत्कालीन अधिकाऱ्यांच्या वादात या कार्यालयाचे महत्त्व संपुष्टात आले. जादा उत्पन्न मिळविण्याच्या स्पर्धेत तालुक्‍यातील लातूर एक, लातूर दोन व मुरूड या तीन रजिस्ट्री कार्यालयांचे एकत्रीकरण करण्यात आले. तालुक्‍यातील नागरिकांना या तीनपैकी कोणत्याही कार्यालयात रजिस्ट्री करता येऊ लागली. यात मुरूड कार्यालय नावालाच उरले असून, सर्वजण लातूरलाच रजिस्ट्री करण्याला प्राधान्य देत आहेत. सध्या या कार्यालयावर दलालांचा ताबा असल्याचे चित्र आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: latur scarcity of officials in registry office