हिंगोली जिल्ह्यात कोरोना लसीकरण बहुमाध्यम जनजागृती अभियानास प्रारंभ

राजेश दारव्हेकर
Wednesday, 17 February 2021

कोरोना लसीकरण तसेच आत्मनिर्भर भारत अभियान या विषयावर बहुमाध्यम चित्ररथाच्या माध्यमातून जनजागृती अभियान राज्यभर राबविण्यात येत आहे.

हिंगोली : केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो महाराष्ट्र आणि गोवा राज्य यांच्यावतीने कोरोना लसीकरण तसेच आत्मनिर्भर भारत अभियान या विषयावर बहुमाध्यम चित्ररथाच्या माध्यमातून जनजागृती अभियान राज्यभर राबविण्यात येत आहे. बुधवार ( ता. १७ ) जिल्ह्यात बहुमाध्यम जनजागृती अभियानाची सुरुवात येथील जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आली.

या बहुमाध्यम रथाचे अतिरिक्त जिल्हाधिकारी शंकर बर्गे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे, क्षेत्रीय लोकसंपर्क ब्युरो नांदेडचे प्रचार अधिकारी माधव जायभाये, जिल्हा माहिती अधिकारी अरुण सुर्यवंशी, सह जिल्हा निबंधक संजय पाटील यांनी हिरवी झेंडी दाखवून तसेच फित कापून उद्घाटन केले.

हेही वाचाGood News:गुरुद्वारा बोर्डाच्या शैक्षणिक संस्थांना अल्पसंख्यांक दर्जा

या बहुमाध्यम चित्ररथामध्ये शाहीर विठ्ठल काटे आणि संच बीड यांच्याद्वारे गीत व नाटक सादरीकरणाच्या माध्यमातून कोरोना लसीकरण, आत्मनिर्भर भारत, शासनाच्या विविध योजना आणि उपक्रमांची जनजागृती करण्यात येणार आहे. या प्रचार मोहिमेचा मुळ उद्देश हा लोकांपर्यत लसीकरण मोहिमेची खरी माहिती देऊन त्यांचा संभ्रम दूर करणे हा आहे. आत्मनिर्भर भारत अभियान या योजनेची माहिती ग्रामीण भागातील लोकांना देण्याचे अमुल्य कार्य या जनजागृती अभियानातून केले जाणार आहे. तसेच एलईडी डिस्प्लेच्या माध्यमातूनही संदेश दाखविण्यात येणार आहेत.  श्राव्य संदेशाचाही समावेश या चित्ररथात करण्यात आला आहे.

दहा दिवस जिल्ह्यातील हिंगोली, सेनगाव, कळमनुरी, वसमत व औंढा नागनाथ या तालुक्यातील ग्रामीण भागात तसेच शहरी भागातून या चित्ररथाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचलन क्षेत्रीय लोकसंपर्क ब्युरोचे नांदेडचे सहायक क्षेत्रीय प्रचार अधिकारी सुमित दोडल यांनी केले.

संपादन- प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Launch of Corona Vaccination Multimedia Awareness Campaign in Hingoli District