नायगावला हरभरा खरेदीचा शुभारंभ

सकाळ वृत्तसेवा
Monday, 20 April 2020


नायगाव येथील खरेदी केंद्रावर तूर खरेदी संपताच हरभरा खरेदीचेही नियोजन करण्यात आले व शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये व हमी दरापेक्षा कमी भावाने हरभरा विकण्याची शेतकऱ्यावर वेळ येऊ नये यासाठी बाजार समितीने हरभरा खरेदीसाठी भौतिक सुविधा उपलब्ध करून दिल्यानंतर सोमवारी हरभरा खरेदीला सुरवात करण्यात आली आहे.

नायगाव, ता. २० (बातमीदार) ः ‘नाफेड’च्या वतीने खरीप हंगाम २०१९-२० मधील हमी भावाने हरभरा खरेदीला आज सोमवारी (ता. २०) पासून सुरवात झाली आहे. या खरेदीचा शुभारंभ बाजार समितीचे सभापती तथा माजी आमदार वसंत चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला आहे.

 

हेही पाहा -   Video : खेळ मांडियेला...नेते लागले श्रेय लाटण्याच्या तयारीला

 

नायगाव येथील खरेदी केंद्रावर तूर खरेदी संपताच हरभरा खरेदीचेही नियोजन करण्यात आले व शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये व हमी दरापेक्षा कमी भावाने हरभरा विकण्याची शेतकऱ्यावर वेळ येऊ नये यासाठी बाजार समितीने हरभरा खरेदीसाठी भौतिक सुविधा उपलब्ध करून दिल्यानंतर सोमवारी हरभरा खरेदीला सुरवात करण्यात आली आहे. हरभरा खरेदीचा शुभारंभ बाजार समितीचे सभापती तथा माजी आमदार वसंत चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी बाजार समितीचे सचिव संजय कदम नाफेडचे प्रतवारीकार मारोती पन्नासे, बाजार समितीचे कर्मचारी माधव कुलकर्णी, काळेश्वर बोमनाळे, ढगे, पंत यांची उपस्थिती होती. या वेळी हरभरा विक्रीसाठी आणलेले शेतकरी रमेश पवळे व वसंत परडे यांचा सत्कार करण्यात आला.

आदेशानुसार हरभरा खरेदी 
सध्याची हेक्टरी नऊ क्विंटल उत्पादकता असल्याने शासनाच्या जुन्या नियमानुसारच खरेदी करण्यात येत आहे. मात्र, पणन विभागाने (ता. १७) एप्रिल रोजी नायगाव बाजार समितीला एक पत्र पाठवून २०१९-२० च्या खरीप हंगामाच्या हेक्टरी उत्पादकतेत कृषी विभागाच्या अहवालावरून बदल केला असून नांदेड जिल्ह्याची हेक्टरी उत्पादकता १७०८ निघाली आहे. त्यामुळे जुन्या आदेशात सुधारणा करण्यात येत असून सुधारीत उत्पादकतेनुसार हरभरा खरेदी करण्यात यावा, अशा सूचना दिल्या असल्या तरी या बाबत आदेश आले नसल्याने जुन्याच उत्पादकतेनुसार हरभरा खरेदी करण्यात येत असून नवीन आदेश आल्यानंतर सुधारीत आदेशानुसार हरभरा खरेदी करण्यात येईल, अशी माहिती सभापती वसंत चव्हाण यांनी दिली आहे.

 

शेतकऱ्यांना संदेश पाठवून हरभरा खरेदीसाठी सूचना
हरभरा खरेदीचा हमी भाव ४८७५ असून हमी भावात हरभरा विक्री करण्यासाठी ३८०० शेतकऱ्यांनी आॅफलाइन नोंदणी केली, तर २४०० शेतकऱ्यांनी आॅनलाइन नोंदणी केली आहे. सध्याची लॉकडाउनची परिस्थिती पाहता आणि सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी दररोज २० ते ३० शेतकऱ्यांना संदेश पाठवून हरभरा खरेदीसाठी सूचना देण्यात येत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Launch of gram shopping in Naigaon, nanded news