बिबट्याने वळविला माजलगाव तालुक्यात मोर्चा, ग्रामीण भागात दहशत

कमलेश जाब्रस
Monday, 30 November 2020

मागील सहा ते सात दिवसांपासून आष्टी तालुक्यात बिबट्याचा वावर असून सोमवारी (ता.३०) दुपारी माजलगाव तालुक्यातील सावरगाव परिसरात बिबट्या दिसल्याने ग्रामीण भागात दहशत पसरली आहे.

माजलगाव(जि.बीड) : मागील सहा ते सात दिवसांपासून आष्टी तालुक्यात बिबट्याचा वावर असून सोमवारी (ता.३०) दुपारी माजलगाव तालुक्यातील सावरगाव परिसरात बिबट्या दिसल्याने ग्रामीण भागात दहशत पसरली आहे. त्यामुळे बिबट्याने माजलगाव तालुक्यात मोर्चा वळविला आहे. तालुक्यातील सावरगाव येथील शेतकरी श्रीराम रंगनाथ नाईकनवरे हे त्यांच्या शेतात काम करत असताना त्यांना अचानक बिबट्या दिसला. त्यांनी आरडाओरड केल्यानंतर हा बिबट्या गव्हाच्या शेतातून पलीकडे पसार झाला.

त्यानंतर मनोज जगताप, सरपंच अभिमान जगताप, सुग्रीव नाईकनवरे, बाबा नाईकनवरे, पिराजी नाईकनवरे यांच्यासह ग्रामस्थांनी पाहणी केली असता परिसरात बिबट्याच्या पावलाचे ठसे आढळले आहे. याबाबत ग्रामस्थांनी तहसिलदार वैशाली पाटील व वनविभागाच्या अधिकाऱ्यांना पोलिस व प्रशासनास माहिती दिली आहे. दरम्यान तालुक्यातील सावरगाव, पायतळवाडी, मंगरूळ क्र १, मंगरूळ क्र.२, लिमगाव, जदीदजवळा, एकदरा, इरला, डूबा, रामपिंपळगाव, फुलेपिंपळगाव, तालखेड, श्रृंगारवाडी या गावातील ग्रामस्थांनी सतर्क राहण्याची गरज आहे.
 
ठसे कुणाचे ?
सोमवारी तालुक्यातील सावरगाव परिसरात ग्रामस्थांनी बिबट्याच्या पायाचे ठसे असल्याचे सांगून त्याचे फोटो काढलेले आहेत. परंतु हे पावलांचे ठसे बिबट्याचेच की अन्य कुणाचे याची खात्री मात्र वन अधिकारी आल्यानंतरच होणार आहे.

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Leopard Come Into Majalgaon Taluka Beed News