आष्टी तालूक्यात जागते रहो! नरभक्षक बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाचे शंभर अधिकारी कर्मचारी! 

  अनिरुद्ध धर्माधिकारी 
Monday, 30 November 2020

तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली शोधमोहीम 

आष्टी (जि. बीड) : नरभक्षक बिबट्याने तालुक्यातील किन्ही येथे दहावर्षीय मुलाचा बळी घेतल्यानंतर तातडीने पावले उचलत तज्ज्ञांच्या पथकासह विविध ठिकाणचे वन अधिकारी-कर्मचारी बिबट्याच्या बंदोबस्तासाठी किन्ही परिसरात दाखल झाले आहेत. सव्वाशेजणांच्या पथकासह परिसरातील ग्रामस्थांनी रात्रभर जागून बिबट्याचा शोध घेतला. परंतु, अद्यापही बिबट्याचा शोध घेण्यात यश आलेले नाही. 

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
आष्टी तालुक्यात नरभक्षक बिबट्याने या आठवड्यात तीन दिवसांच्या अंतराने दोन बळी घेतले. प्रथम मंगळवारी (ता. २४) बिबट्याने सुरुडी येथील तरुण शेतकरी व मोराळा पंचायत समिती गणाच्या सदस्या आशा गर्जे यांचे पती नागनाथ गर्जे यांच्यावर हल्ला करून त्यांना ठार केले. शेतात दुपारच्या वेळी तुरीला पाणी देत असताना हा प्रकार घडला. त्यानंतर अवघ्या दोनच दिवसांत म्हणजे शुक्रवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास बिबट्याने सुरुडी परिसरातीलच किन्ही (काकडेची) येथे स्वराज ऊर्फ यश सुनील भापकर या दहावर्षीय मुलालाही ठार केले. अवघ्या तीन दिवसांत नरभक्षक बिबट्याने तीन बळी घेतल्याने सुरुडी परिसरासह तालुक्यातील ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. किन्हीतील घटनेची दखल घेत वन विभागाने तातडीने पावले उचलली.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

त्यानुसार रात्रीपर्यंत औरंगाबाद, यवतमाळ, नंदूरबार, नाशिक, नगर व बीड जिल्ह्यातील वन विभागाचे सुमारे १०० अधिकारी-कर्मचारी या ठिकाणी दाखल झाले. बिबट्याला पकडण्यासाठी रात्रीपासून शोधमोहीम (कोम्बिंग ऑपरेशन) सुरू करण्यात आले आहे. सुरुडी परिसरात यापूर्वी तीन पिंजरे बसविण्यात आलेले आहेत. कालपासून या भागात आणखी सात पिंजरे बसविण्यात आले आहेत. वन विभागाच्या या सर्व सुमारे सव्वाशे अधिकारी-कर्मचारी व स्थानिक ग्रामस्थांनी कालची रात्र जागून काढली. परंतु, बिबट्याचा ठावठिकाणा लागू शकलेला नाही. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

तज्ज्ञांचे पथक, अत्याधुनिक साधने 
बिबट्याला पकडण्यासाठी तज्ज्ञांचे पथक दाखल झाले आहे. प्रत्येक पथकात चार-पाच तज्ज्ञांचा समावेश आहे. औरंगाबाद येथील दोन पथके व अमरावतीचे एक पथक असे बारा-पंधराजण दाखल झाले. नांदेडचेही एक पथक दाखल झाले आहे. या सुमारे वीस तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली हे कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात येत आहे. ड्रोन कॅमेरा, सीसीटीव्ही व इतर अत्याधुनिक साधनांची मदतही घेण्यात आली आहे. 

(संपादन-प्रताप अवचार)
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Stay awake Ashti taluka Hundreds forest officer to catch maneating leopard