बिबट्याची दहशत; हाती बंदूक, काठी घेऊन आमदार सुरेश धसांनी दिला जागता पहारा

दत्ता देशमुख
Sunday, 29 November 2020

वनविभागाच्या जवानांसोबत भाजप आमदार सुरेश धस यांनीही हाती बंदूक आणि काठी घेऊन शुक्रवार (ता.२७) व शनिवारी (ता.२८) मध्यरात्रीपर्यंत जागता पहारा दिला.

बीड : अगोदर चर्चा, नंतर दर्शन आणि आता थेट नरबळी घेणाऱ्या बिबट्यामुळे जिल्ह्यात भितीचे वातावरण आहे. विशेषत: दोन बळी घेतलेल्या बिबट्याची सर्वाधिक दशहत आणि भिती आष्टी तालुक्यात असून आता बिबट्या जेरबंद करण्यासाठी वनविभाग ताकदीने मैदानात उतरला आहे. वनविभागाच्या जवानांसोबत भाजप आमदार सुरेश धस यांनीही हाती बंदूक आणि काठी घेऊन शुक्रवार (ता.२७) व शनिवारी (ता.२८) मध्यरात्रीपर्यंत जागता पहारा दिला.

सुरडी (ता. आष्टी) येथील नागनाथ गर्जे तसेच किन्ही येथे आजोळी आलेल्या स्वराज भापकर या नऊ वर्षीय बालकाला मानवी वस्तीतून लोकांसमक्ष उचलून नेऊन बिबट्याने ठार केले. त्यामुळे या भागात बिबट्याची मोठीच दहशत निर्माण झाली आहे. या दोन बळीनंतर वनविभागाला जाग आली आणि बिबट्याला जेरबंद करण्यासाठी अमरावती, नाशिक व औरंगाबाद येथील वनविभागाच्या जनावांचा जत्था शुक्रवारी (ता.२७) रात्री घटना घडलेल्या सुरडी व किन्ही या गावी पोचला.

आधुनिक गन्स (गोळीच्या माध्यमातून भुल यावी अशा) असलेले जवान रात्री पोचले मात्र त्यांच्या जेवणाची अडचण होती. मात्र, भाजप आमदार सुरेश धस यांनी तत्काळ या जवानांच्या जेवणाचा बंदोबस्त केला. लोकांमध्ये भिती असल्याने जवारांनी रात्री गस्त सुरु केली. सुरेश धसही जवानांसोबत हाती गन आणि काठी घेऊन त्यांच्यासोबत मध्यरात्रीपर्यंत थांबून राहिले.

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Leopard Fear In Beed District, MLA Sures Dhas Done Petrolling