आष्टीत बिबट्याची दहशत सुरुच, मंगरूळमध्ये पुन्हा माय-लेकावर हल्ला

अनिरुद्ध धर्माधिकारी
Saturday, 28 November 2020

सुदैवाने जीव वाचला, ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू  

आष्टी (बीड) : आष्टी शहराजवळील मंगरूळ येथे बिबट्याने माय-लेकावर हल्ला करून जखमी केले. सुदैवाने या हल्ल्यात जीवाला धोका झाला नाही. आज (शनिवार) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली. 

शीलावती बाबा दिंडे (वय 42) व अभिषेक बाबा दिंडे (वय 12 वर्षे) हे माय-लेक बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झाले. तुरीला पाणी देण्यासाठी शेतात गेलेल्या या मायलेकावर तुरीच्या पिकातून येत बिबट्याने हल्ला चढविला. त्यात त्यांच्या हाताला व पायाला जखमा झाल्या. यावेळी आजूबाजूला अनेक शेतकरी होते. मोठा आरडाओरडा झाल्याने बिबट्या पळून गेला. जखमींवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

नरभक्षक बिबट्याचा बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात दुसरा बळी, काकासमोर बालकाला नेले उचलून आष्टी तालुक्यातील सुरुडी येथे तरुण शेतकऱ्याचा बळी घेतल्यानंतर सुरुडीपासून जवळच असलेल्या किन्ही (काकडेची) येथे बिबट्याने दुसरा बळी घेतला आहे. शुक्रवारी (ता.२७) दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास बिबट्याने शेतातील विहिरीवर पाणी देण्यासाठी गेलेल्या दहा वर्षीय स्वराज ऊर्फ यश सुनील भापकर या बालकावर झेप घालून उचलून नेले. काही वेळात परिसरात या बालकाचा छिन्नविछिन्न अवस्थेतील मृतदेह आढळून आला. या घटनेने परिसरात प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

आष्टी तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा उच्छाद सुरू आहे. मोराळा पंचायत समिती गणाच्या सदस्या आशा गर्जे यांचे पती नागनाथ गर्जे यांना बिबट्याने मंगळवारी भरदिवसा शेतात हल्ला करून ठार केले. शेतात तुरीला पाणी घालत असताना ही घटना घडली. या घटनेला दोन दिवस उलटत नाहीत, तोच आज शुक्रवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. स्वराज हा मूळचा खराटवाडी (ता. श्रीगोंदा, जि. नगर) येथील रहिवासी असून तो दिवाळीनिमित्त आजोळी आजीकडे आला होता. शुक्रवारी तो मावशीच्या पतीबरोबर (काका) तो शेतातील तुरीच्या पिकाला पाणी देण्यासाठीची विहिरीवरील मोटार चालू करण्यासाठी गेला होता. या वेळी तुरीच्या पिकातून आलेल्या बिबट्याने झेप घेत काकासमोर स्वराजला मानेला पकडून उचलून नेले. काकाने आरडाओरडा केला. त्यानंतर शोधाशोध केली असता जवळच्याच डोंगराळ भागात स्वराजचा छिन्नविछिन्न अवस्थेतील मृतदेह आढळून आला.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

आजोळी आला मृत्यू
स्वराज भापकर हा श्रीगोंदा तालुक्यातील रहिवासी असून, तो आजोळी काकडेची किन्ही येथे दिवाळीनिमित्त आलेला होता. स्वराजचे वडील शेतकरी आहेत. आई-वडिलांचा तो एकुलता एक मुलगा होता. मावशीच्या पतीबरोबर (काका) तो शेतात आला होता. मोटार चालू करताना अचानक तुरीच्या पिकातून झेप घेत बिबट्याने त्याला काकासमोर उचलून नेले. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

दहशतीत अधिकच भर
दरम्यान, बिबट्याने शेतकऱ्याला ठार केलेल्या सुरुडी या गावापासून काकडेची किन्ही हे गाव सात ते आठ किलोमीटर अंतरावर आहे. आष्टी तालुक्याच्या डोंगरपट्ट्यातील ही गावे असून, तीन दिवसांत बिबट्याने दोन बळी घेतल्याने परिसरातील गावांसह तालुक्यात दहशत पसरली आहे. गुरुवारी (ता. २६) आष्टी शहराजवळ तसेच धानोरा, वाघळूज भागात तसेच आजही (ता. २७) शहरानजीक वारंगुळेवस्तीवर बिबट्या दिसल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Leopard terror continues again attack mother daughter