औरंगाबादकरांनो सावधान! शहरात घुसला बिबट्या, युद्ध पातळीवर शोध सुरू

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 डिसेंबर 2019

घटनास्थळी दाखल झालेल्या वनविभागाच्या कर्मचाऱ्यांकडे बिबट्याला बेशुद्ध करण्यासाठी इंजेक्शन नाही. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेसाठी दिसताच क्षणी त्याला मारलेही जाऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

औरंगाबाद - शहरातील एन-वन परिसरात आज (मंगळवारी) पहाटे मॉर्निंग वॉक करणाऱ्यांना बिबट्या दिसला. त्यामुळे खळबळ उडाली असून, स्थानिकांनी लागलीच ही माहिती तत्काळ वन विभाग आणि पोलिसांनी दिली आहे. पोलिस आणि वन विभागाचे अधिकारी- कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून, काळ गणपती मंदिरा मागील गार्डनमध्ये सकाळी नऊपर्यंत युद्ध पातळीवर बिबट्याचा शोध सुरू होता.

मानवी वस्त्यांमध्ये येऊन बिबट्यांनी हल्ले करण्याच्या घटना काही वर्षांपासून सातत्याने वाढत आहेत. कमी झालेल्या जंगलांमुळे बिबट्यांना जंगलाबाहेर येऊन, भक्ष्याचा शोध घ्यावा लागत आहे. शहरातील एन वन सिडको परिसरामध्ये आज (मंगळवारी) सकाळी स्थानिक रहिवाशांना मॉर्निंग वॉक करीत असताना बिबट्या आढळून आला. सिडको परिसरातील काळा गणपती मंदिरामागे असलेल्या गार्डनमध्ये हा बिबट्या घुसल्याचे नागरिकांनी सांगितले. त्यानंतर तातडीने पोलिस आणि वन विभागाला कळविण्यात आले. हा बिबट्या अद्यापही त्याच गार्डनमध्ये असल्याचे लोकांनी सांगितले. त्यामुळे वन विभागाच्यावतीने पिंजरा, जाळे आणून शोध सुरू करण्यात आला आहे. दरम्यान, घटनास्थळी दाखल झालेल्या वनविभागाच्या कर्मचाऱ्यांकडे बिबट्याला बेशुद्ध करण्यासाठी इंजेक्शन नाही. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेसाठी दिसताच क्षणी त्याला मारलेही जाऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

यापूर्वी बिबट्यांनी जिल्ह्यातील ग्रामीण भागात किंवा शेतांवर येऊन पाळीव जनावरांवर आणि माणसांवर हल्ले करण्याच्या घटना जरंडी, सोयगाव, कन्नड, गौताळा, लंगडा-तांडा  शिवारांत घडलेल्या आहेत. पण आता पहिल्यांदाच शहरात बिबट्या आढळला आहे. त्यामुळे शहरातील सिडकोवासीयांमध्ये खळबळ उडाली आहे.
 
कुठून आला असावा?

एन-वन परिसरात हर्सूल, पळशी शहर या भागातून बिबट्या शहरात आला असावा, असा अंदाज पशुप्रेमींनी व्यक्त केला. बिबट्या आणि इतर हिंस्र पशू शहरात आणि नागरी वस्तीत येऊ नये यासाठी जंगली भागात पाणीसाठे निर्माण करणे, वनांत निरनिराळ्या गवतप्रजाती, वृक्षांखाली दाटीने वाढणाऱ्या छोट्या वनस्पती आणि छोटी-मोठी झुडुपे यांची लागवड करणे, टेकड्या, दऱ्या, आणि पठारांवर वृक्ष लागवड करणे असे प्रयत्न व्हायला हवेत. त्यातून बिबट्यांना जंगलाबाहेर येण्याची गरज भासणार नाही, असे मतही पशूप्रेमींनी व्यक्त केले. 

का आला मानवी वस्तीत?
नैसर्गिक अधिवासांचा संकोच आणि नैसर्गिक भक्ष्याची कमतरता ही मुख्य कारणं बिबट्या वस्तीवर येण्यामागे असतात. त्यासाठी त्याचे अधिवास सुरक्षित आणि सक्षम ठेवणे हे महत्त्वाचे आहे.  बिबट्या हा अत्यंत प्रतिकूल भौगोलिक परिस्थितीलाही तोंड देऊ शकणारा प्राणी आहे. तो दाट जंगल, विरळ जंगल, झुडुपी जंगल, गवताळ रान, डोंगरी मुलुख, माळरान अशा कोणत्याही भौगोलिक प्रदेशांमध्ये जगू शकतो.

कोण म्हणाले - हिंदू तरुणांवरील गुन्हे मागे घ्या 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Leopard Found in CIDCO NA Aurangabad