बिबट्या सापडेना, शोधमोहीम गुंडाळण्याची तयारी; पंधरा दिवसांच्या मोहिमेत हाती काहीच नाही

अनिरुद्ध धर्माधिकारी
Monday, 7 December 2020

आष्टी तालुक्यात गेल्या सुमारे पंधरा दिवसांपासून सुरू असलेली नरभक्षक बिबट्या शोधमोहीम अद्याप सुरूच आहे. मात्र, बिबट्या काही हाती लागलेला नाही.

आष्टी (जि.बीड) : आष्टी तालुक्यात गेल्या सुमारे पंधरा दिवसांपासून सुरू असलेली नरभक्षक बिबट्या शोधमोहीम अद्याप सुरूच आहे. मात्र, बिबट्या काही हाती लागलेला नाही. तालुक्यातील सुरुडी, किन्ही व पारगाव जोगेश्वरीत तिघांना ठार केल्यानंतर बिबट्याने करमाळा (जि. सोलापूर) तालुका हद्दीत नुकतेच दोन बळी घेतले आहेत. त्यामुळे नरभक्षक बिबट्या करमाळ्याकडे गेल्याचा अंदाज बांधत वन विभागाने शोधमोहिमेसाठी आता करमाळ्याकडे जास्त लक्ष केंद्रित केले आहे.

 

गेल्या महिन्यात नरभक्षक बिबट्याने तालुक्याला लागून असलेल्या पाथर्डी (जि. नगर) येथे धुमाकूळ घालून तीन बालकांचे बळी घेतले. त्यावेळी हा नरभक्षक बिबट्या पाथर्डी-आष्टी हद्दीवरील गावांत दहशत पसरली होती. त्यानंतर तालुक्यातील सावरगाव (मायंबा) परिसरात एक मादी बिबट्या मागील महिन्यात जेरबंद झाला. त्यामुळे या भागात बिबट्या असल्यावर शिक्कामोर्तब झाले. दरम्यान, या घटनेला पंधरा दिवस उलटत नाहीत, तोच तालुक्यातील सुरुडी येथे २४ नोव्हेबर रोजी बिबट्याने नागनाथ गर्जे या शेतकऱ्यांचा तालुक्यातील पहिला बळी घेतला.

 

त्यानंतर तीनच दिवसांत २७ रोजी सुरुडी परिसरातीलच किन्ही येथे दहावर्षीय स्वराज ऊर्फ यश सुनील भापकर या बालकाचा बिबट्याने बळी घेतला. या ठिकाणी वन विभागाचा फौजफाटा कामाला लागलेला असताना सुरुडी-किन्हीपासून दूर आष्टी शहराजवळ असलेल्या मंगरूळ येथे बिबट्याने २८ रोजी सायंकाळी माय-लेकावर हल्ला केला. त्यात सुदैवाने जीवित हानी झाली नाही. या हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी रविवारी (ता. २९) बिबट्याने याच पारगाव जोगेश्वरी येथे वृद्ध महिलेवर हल्ला केला. त्यात ती गंभीर जखमी झाली. शिवाय त्याच दिवशी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास पारगावातच बिबट्याने एका महिलेचा बळी घेतला.

दरम्यान, आष्टीत शोधमोहीम सुरू असताना बिबट्याने कर्जत (जि. नगर) हद्दीवरील शेगुळवाडी (ता. करमाळा, जि. सोलापूर) भागात एका महिलेला ठार केले. तसेच तेथून १२ किलोमीटरवरील अंजनडोह येथे एका पुरुषाला शिकार बनविले. या ठिकाणी हल्ल्याच्या व भक्ष्य खाण्याच्या पद्धतीवरून आष्टीतीलच नरभक्षक बिबट्या करमाळ्याकडे गेल्याचा अंदाज वन विभागाने बांधला आहे.

आष्टी तालुक्यात १३ पिंजरे
आष्टी तालुक्यात सध्या विविध ठिकाणी तेरा पिंजरे लावण्यात आलेले आहेत. त्यात सुरुडी भागात दोन, किन्ही एक, पारगाव जोगेश्वरी सात, जामगाव एक, वाळुंज एक व खडकत एक अशी एकूण १३ संख्या आहे.

पथकाची विभागणी
सुरुडी-किन्हीतील घटनेनंतर आष्टीत तज्ज्ञांसह १२५ अधिकारी-कर्मचारी तैनात होते. आता बिबट्याने करमाळ्याकडे स्थलांतर केल्यामुळे आष्टी व पाटोदा येथील कर्मचारी आष्टीत काम पाहणार आहेत. औरंगाबाद, अमरावती, नांदेड व उस्मानाबाद अशा चारही टीम सध्या आष्टीतच आहेत. यातील काही टीम आज-उद्या करमाळ्याकडे पाठविण्यात येतील, असे सांगण्यात आले. शार्प शूटर व अन्य तज्ज्ञ पथकाचीही विभागणी करण्यात आली असून आष्टीतील काहीजण अंजनडोह येथे पाठविण्यात आले आहेत.

 

Edited - Ganesh Pitekar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Leopard Not Found In Search Campaign Ashti Beed News