
लातूरपासून जवळच असलेल्या बाभळगाव येथे पालकमंत्री अमित देशमुख यांच्या शेतात आढळून आलेला बिबट्या अद्याप पिंजऱ्यात अडकला नाही. गेल्या दोन दिवसांत त्याचे दिसलाही नाही. त्यामुळे तो आहे की पळून गेला, अशी चर्चा आता सुरू झाली आहे. तरीसुद्धा बिबट्यावर लक्ष ठेवण्यासाठी बाभळगावात वनविभागाने तळ ठोकला आहे.
लातूर : लातूरपासून जवळच असलेल्या बाभळगाव येथे पालकमंत्री अमित देशमुख यांच्या शेतात आढळून आलेला बिबट्या अद्याप पिंजऱ्यात अडकला नाही. गेल्या दोन दिवसांत त्याचे दिसलाही नाही. त्यामुळे तो आहे की पळून गेला, अशी चर्चा आता सुरू झाली आहे. तरीसुद्धा बिबट्यावर लक्ष ठेवण्यासाठी बाभळगावात वनविभागाने तळ ठोकला आहे. बिबट्याला पकडण्यासाठी जादा कुमकही मागवली आहे.
बाभळगावात काही शेतकऱ्यांना दोन दिवसांपूर्वी रविवारी (ता.तीन) बिबट्या दिसला. देशमुख यांच्याच शेतात काम करणाऱ्या शेतमजुरांनी आणि आसपासच्या शेतकऱ्यांनी बिबट्याला पाहिले. या घटनेनंतर या भागात भीतीचे वातावरण पसरले. ही घटना समजताच वन विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी बिबट्याला पकडण्यासाठी तीन पिंजरे लावले. शिवाय, ड्रोन आणि ट्रॅप कॅमेरे यांचीही मदत घेतली जात आहे. पण, अद्याप बिबट्याची कसलीही हालचाल वन विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना जाणवली नाही. दोन दिवसांपूर्वी बिबट्याच्या पाऊलखुणा दिसल्याने वन विभागाने या भागात सर्च ऑपरेशन सुरूच ठेवले आहे. तीस जणांचा चमू टीम हा परिसर पिंजून काढत आहे.
तळीरामांना गर्दी भोवली, लातुरात दारू विक्री बंद
उस्मानाबाद-लातूर विभागिय वनक्षेत्रपाल म. रा. गायकर यांनी बाभळगावाला भेट दिली असून या परिसरात शेतकरी, नागरिकांनी सावध रहावे. लहान मुलांची विशेष काळजी घ्यावी. शक्यतो एकट्याने घराबाहेर पडू नये, असे आवाहन केले आहे. सदरील परिसरात दोन-तीन शेतकऱ्यांनी एकत्रित राहून शेतीची कामे करावीत. सोबत लांब काठी असावी. बसून किंवा वाकून करावयाची शेतीची काम शक्यतो थोडे दिवस टाळावेत. महिलांनी खुरपणीचे कामे करू नयेत, असेही गायकर यांनी सांगितले. या वेळी वन परिक्षेत्र अधिकारी सी. जी. पोतुलवार, वन परिमंडल अधिकारी एन. एस. पचरंडे आणि एम. वाय. पवार उपस्थित होते.