Vidhan Sabha 2019 : मराठवाड्यात बंडखोरीने गाजला अखेरचा दिवस

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 5 October 2019

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी शुक्रवारी (ता. चार) मराठवाड्यात ठिकठिकाणी उमेदवारांनी फेऱ्या, मिरवणुका आणि सभांद्वारे जोरदार शक्तिप्रदर्शन केले. काही ठिकाणी नाराजीनाट्य रंगले. त्यातून बंडखोरी झाली आणि काहींनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केले. अर्जछाननी, माघारीनंतर कोण कोण रिंगणात राहतात, कशा लढती होतात, हे कळेल.

विधानसभा 2019 
औरंगाबाद -
विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस, शुक्रवार उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी फेरी, सभांनी शक्तिप्रदर्शन करीत गाजविला. अखेरपर्यंत जाहीर होणारी उमेदवारी, नाराजी नाट्य, त्यातून उफाळलेली बंडखोरी, बंडखोरी करणाऱ्यांनाही आरोप प्रत्यारोपांसह शक्तिप्रदर्शन करीत भरलेले अर्ज हे आजचे वैशिष्ट्य ठरले. पावसाने हजेरी लावल्याने काही ठिकाणी कार्यकर्त्यांची तारांबळ उडाली, तर नेत्यांनी भरपावसातच भाषण ठोकले. 

मराठवाड्यातील 48 मतदारसंघात सुरवातीला उमेदवारी अर्ज ताब्यात घेण्यावरच बहुतांश उमेदवारांनी भर दिला होता. नवरात्रोत्सवाच्या मुहूर्तावर अनेकांनी अर्ज दाखल करायला सुरवात केली. प्रमुख पक्षांच्या उमेदवारी याद्या टप्प्याटप्प्याने आणि अंतिम दिवसापर्यंत येत राहिल्याने काल व आज शक्तिप्रदर्शनाने राजकीय धुरळा उडाला. अनेकांनी फेरी, सभा घेत उमेदवारी
अर्ज दाखल केले. अखेरच्या दिवशी, अर्ज दाखल करणाऱ्यांची संख्या अधिक होती. बहुतांश मतदारसंघांत उमेदवारांची गर्दी असून उमेदवारी अर्जांची शनिवारी (ता. पाच) छाननी होईल. सात ऑक्‍टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज माघे घेता येतील. त्यानंचरच लढतींचे खरे चित्र समोर येईल. 

दीड हजारांवर अर्ज 
मराठवाड्यात 48 मतदारसंघ आहेत. आठपैकी सात जिल्ह्यांतील मतदारसंघांत सुमारे दीड हजारांपेक्षा अधिक अर्ज दाखल झाले आहेत. सायंकाळनंतर अर्जांची जुळवाजुळव करण्यात प्रशासन गर्क होते. छाननीसाठी सज्जता होत होती.  

औरंगाबाद जिल्हा 

 • औरंगाबाद मध्यमधून शिवसेनेचे प्रदीप जैस्वाल, राष्ट्रवादीचे अब्दुल कदीर मौलाना, एमआयएमचे नासेर सिद्दीकी, 'वंचित'चे अमित भुईगळ यांचे शक्तिप्रदर्शन 
 • औरंगाबाद पूर्वमधून समाजवादी-कॉंग्रेस आघाडीचे कलीम कुरेशी, "बसप'चे किशोर म्हस्के यांच्यातर्फे फेरी 
 • औरंगाबाद पश्‍चिममधून एमआयएमचे अरुण बोर्डे, वंचितचे संदीप शिरसाट यांचे शक्तिप्रदर्शन 

 

जालना जिल्हा 

 • परतूर : माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया (कॉंग्रेस) यांचा शक्तिप्रदर्शनाने अर्ज, शिवाजी चवणे (वंचित), प्रकाश सोळंके (मनसे) यांचाही अर्ज 
 • भोकरदन : आमदार संतोष दानवे (भाजप) यांचा फेरीद्वारे अर्ज 
 • बदनापूर : आमदार नारायण कुचे (भाजप) यांचा शक्तिप्रदर्शन करीत अर्ज, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, राज्यमंत्री अर्जुन खोतकर आदींची उपस्थिती. राजू आहिरे (शिवसेना),
 • राजेंद्र मगरे (वंचित) यांच्यातर्फेही फेरी काढून अर्ज. राजेंद्र भोसले (मनसे) यांचाही अर्ज. 

 हिंगोली जिल्हा

 •  हिंगोलीत भाजपचे आमदार तान्हाजी मुटकुळे यांचे शक्‍तिप्रदर्शन 
 •  वसमतमध्ये भाजपचे ऍड. शिवाजी जाधव यांची शक्तिप्रदर्शनासह अपक्ष उमेदवारी 
 • कळमनुरीत माजी खासदार ऍड. शिवाजी माने, माजी आमदार गजानन घुगे यांचे अपक्ष म्हणून अर्ज 
 • कळमनुरीत अजित मगर, तर हिंगोलीत वसीम देशमुख यांची वंचितकडून उमेदवारी 

 
परभणी जिल्हा 

 • गंगाखेडला शिवसेनेचे विशाल कदम यांचे शक्तिप्रदर्शन, 'वंचित'च्या करुणाताई कुंडगीर यांचे शक्तिप्रदर्शन 
 • परभणीत कॉंग्रेसचे रविराज देशमुख यांचा सभा घेऊन अर्ज, कॉंग्रेसचे बंडखोर उमेदवार सुरेश नागरे यांची लक्षवेधी फेरी 
 • जिंतूरमधून मेघना बोर्डीकर यांचा भाजपकडून अर्ज 
 • शिवसेनेचे बंडखोर उमेदवार डॉ. जगदीश शिंदे यांचा पाथरीतून अर्ज 

 
नांदेड जिल्हा 

 • नायगाव : भाजप-शिवसेना महायुतीचे राजेश पवार यांचे जोरदार शक्तिप्रदर्शन 
 •  लोहा : श्‍यामसुंदर शिंदे यांचा (अपक्ष) उमेदवारी अर्ज 
 •  महायुतीतील शिवसंग्राम पक्षाचे उमेदवार भीमराव केराम यांचा शक्तिप्रदर्शनाने किनवटला अर्ज 
 • भाजपचे ज्येष्ठ नेते भास्करराव पाटील खतगावकर, खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्यासह आमदार डॉ. तुषार राठोड यांचे मुखेडमध्ये शक्तिप्रदर्शन 
 • हदगावसाठी अखेरच्या दिवशी माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी कॉंग्रेस पक्षाकडून, तर शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख बाबूराव कदम कोहळीकर यांना शिवसेनेने
 • उमेदवारी नाकारल्यानंतर बंडाचा झेंडा, दोघांकडून शक्तिप्रदर्शन 
 • देगलूरमध्ये शिवसेनेकडून आमदार सुभाष साबणे यांचा अर्ज

 
बीड जिल्हा 

 • माजलगावमधून भाजपकडून महायुतीचे रमेश आडसकर यांचे जोरदार शक्तिप्रदर्शन, पंकजा मुंडेंच्या उपस्थितीत सभा 
 • फेरीत आडसकर यांच्यासमवेत उमेदवारीसाठी इच्छुक असलेले मोहन जगताप, ओमप्रकाश शेटेही सहभागी. 
 • केजमधून भाजपतर्फे नमिता मुंदडा यांचा अर्ज, खासदार डॉ. प्रीतम मुंडे, उमेदवारी न मिळालेल्या आमदार संगीता ठोंबरेही सोबत. 
 •  बीडमधून राष्ट्रवादीचे संदीप क्षीरसागर यांचे फेरीद्वारे जोरदार शक्तिप्रदर्शन 
 • आष्टीतून बाळासाहेब आजबे यांचा अर्ज, सतीश शिंदे यांनीही बंडखोरी करीत केले शक्तिप्रदर्शन. 
 • बीडमधून भाजपचे राजेंद्र मस्के यांचा अपक्ष म्हणून अर्ज 
 • बीडमध्ये "वंचित'च्या उमेदवारीत तीन दिवस नाट्यमय घडमोडी. अशोक हिंगे यांना उमेदवारी जाहीर झाली; परंतु शिवराज बांगर यांना एबी फॉर्म मिळाला होता. पुन्हा यात बदल
 • करून हिंगे यांना उमेदवारी देण्यात आली. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Letest news about vidhan sabha 2019 election in Marathwad