esakal | पक्षसंघटन मजबुतीसाठी मेहनत घेऊ
sakal

बोलून बातमी शोधा

File photo

राष्ट्रवादीचे नेते जीवनराव गोरेंसह तीन आमदारांचा निर्धार 

पक्षसंघटन मजबुतीसाठी मेहनत घेऊ

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

उस्मानाबाद  ः आम्ही राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शिलेदार असून पक्षात राहून पक्षसंघटना बळकट करण्यासाठी मेहनत घेऊ, असे मत पक्षाचे नेते तथा एसटी महामंडळाचे माजी अध्यक्ष जीवनराव गोरे यांच्यासह पक्षाच्या तीन आमदारांनी व्यक्त केले. 


राष्ट्रवादी कॉंग्रेसचे येथील आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर गोरे यांच्यासह आमदार राहुल मोटे, सतीश चव्हाण व विक्रम काळे, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष सुरेश बिराजदार, माजी नगराध्यक्ष अमित शिंदे आदींनी सोमवारी (ता. दोन) येथे पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली. गोरे म्हणाले, की राणाजगजितसिंह यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची साथ सोडायला नको होती. सत्ता येते, जाते; पण निष्ठा महत्त्वाची असते. मला व्यक्तिगत या निर्णयाची कल्पना नव्हती. पण, वाशी येथे झालेल्या मेळाव्याला ते हजर राहिले नाहीत, तेव्हा मला शंका आली होती. राणाजगजितसिंह यांच्याशी चर्चा झाली तेव्हा मी माझी भावना बोलून दाखविली होती, पण त्यांच्याकडून नंतर कोणतेच उत्तर आले नाही.' पक्षाचा जिल्हाध्यक्ष लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. तत्पूर्वी शरद पवार जिल्ह्यात येणार असून त्यांच्या उपस्थितीत पक्षाचा मेळावा आयोजित केला जाणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

पक्षांतराच्या मुद्यावर बोलताना गोरे बचावात्मक पवित्र्यात होते. अनेक गोष्टी आहेत, पण त्या जाहीर बोलता येत नसल्याचेही त्यांनी सांगितले. 
आमदार मोटे म्हणाले, "राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते एकत्र आहेत. काही प्रमाणात पडझड झाली असली तरी नव्याने पक्षबांधणी करावी लागेल'. 
आमदार काळे म्हणाले, "पक्षाने सगळी पदे दिले तरीही फक्त दुसरीकडे काहीतरी मिळणार हे पाहून "त्यांनी' पक्ष बदलला आहे. अशा लोकांच्या जाण्याने पक्षाला फरक पडणार नाही. दोन तालुक्‍यांमधील काही कार्यकर्ते त्यांच्याबरोबर गेले असले तरी पुन्हा नव्याने पक्ष उभा करण्याचे आव्हान आमच्यासमोर आहे. "त्यांच्या' जाण्याने अनेक नवीन कार्यकर्ते आमच्याशी जोडले गेले आहेत. यापुढे तरुणांना अधिक वाव देण्याचा पक्षाचा विचार आहे.' 
आमदार चव्हाण म्हणाले, "पक्ष, संघटना ही विचारावर आधारित असते. ती एका व्यक्तीच्या जाण्याने संपत नसते. त्यामुळे येत्या काळात पुन्हा जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीची शक्ती पाहायला मिळेल.' 

loading image
go to top