धर्माबादेत पाचशे रुपायांसाठी जीव धोक्यात

सुरेश घाळे
बुधवार, 8 एप्रिल 2020


प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेतून जनधन बँक खात्यावर केंद्र सरकारने ५०० रुपयांची रक्कम टाकली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गरिबांना शासनाकडून तीन महिने प्रतिमाह ५०० रुपयांची रक्कम टाकण्याचे आदेश देऊन (ता.तीन) एप्रिलपासून ही रक्कम जमा करण्यास सुरवात केली आहे.

धर्माबाद, (जि. नांदेड) ः प्रधानमंत्री जनधन योजना बँक खात्यावर जमा झालेल्या पाचशे रुपयांच्या मिळकतीसाठी धर्माबाद शहरात महिलांनी मंगळवारी (ता. सात) सकाळपासून स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेसमोर तोबा गर्दी केली होती. प्रधानमंत्री जनधन योजनेच्या पाचशे रुपायांसाठी कौटुंबिक प्रमुख असलेल्या महिलांचा लाख मोलाचा जीव सोशल डिस्टन्स न पाळल्याने धोक्यात आल्याचे चित्र शहरासह येताळा येथेही पाहावयास मिळाले.

 

प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेतून जनधन बँक खात्यावर केंद्र सरकारने ५०० रुपयांची रक्कम टाकली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गरिबांना शासनाकडून तीन महिने प्रतिमाह ५०० रुपयांची रक्कम टाकण्याचे आदेश देऊन (ता.तीन) एप्रिलपासून ही रक्कम जमा करण्यास सुरवात केली आहे. ही रक्कम काढण्यासाठी नागरिकांनी गर्दी करू नये, एटीएम अथवा डिजिटल बँक सेवेचा वापर करावा, असे आवाहनही करण्यात आले आहे. परंतु, कोरोनाचा संसर्ग कोणीही गांभीर्याने घेत नाहीत. नागरिकांकडून शासनाच्या सोशल डिस्टन्स आदेशाचे तीनतेरा वाजून संचारबंदीतील सर्व नियम पायदळी तुडविल्या जात आहेत. कोरोना विषाणू झपाट्याने संपूर्ण जगात हैदोस घालून अनेकांचे बळी घेत आहे. 

 

या आजारांवर नियंत्रण मिळविण्यासाठी सोशल डिस्टन्स ठेवणे हाच एकमेव पर्याय आहे. केंद्र व राज्य सरकारने (ता. २३) मार्चपासून लॉकडाउनचा निर्णय घेतला. अन्न व पाण्यामुळे गोरगरीब जनतेची उपासमार होऊ नये, यासाठी सरकारने मोफत धान्य व जनधन खात्यावर ५०० रुपयांची आर्थिक मदत दिली आहे. ज्या महिलांनी जनधन खाते उघडली आहे. त्यांच्या खात्यावर ही रक्कम टाकण्यात आली आहे. ती रक्कम काढण्यासाठी मात्र लाभार्थी शासनाचे सर्व नियम पायदळी तुडवत आहेत. शहरातील गर्दी तोडावी यासाठी प्रशासन दररोज नवनवीन उपाययोजना करीत आहे. परंतु, जनधन योजनेतील लाभार्थींनी प्रशासनाच्या प्रयत्नांवर पाणी फेरले आहे. बँक प्रशासनाकडून नागरिकांना सोशल डिस्टन्स चे पालन करण्याचे आवाहन केले जात आहे. पोलिसांकडूनही कोरोनाच्या संसर्ग टाळण्यासाठी सामाजिक अंतर ठेवण्याची विनवणी केली जात आहे.

 

हेही वाचा -  प्रवासी नागरिकांनी माहिती द्यावी

घरपोच विड्रॉलची सुविधा सुरू करावी
खातेदारांना कोरोना विषाणू प्रतिबंधच्या पार्श्वभूमीवर वित्त मंत्रालयाच्या वित्तीय सेवा विभागाने वेळापत्रक आखून दिले आहे. त्याचे तंतोतंत पालन केल्यास बँकेत जेणेकरून गर्दी होत नाही. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगचे पालन करता यावे म्हणून स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेच्या वतीने नियोजन करण्यात आले असले तरी नागरिक मात्र कोरोनाचे गांभीर्य घेत नाहीत. जनधन जमा झालेल्या मजुरांचे ५०० रुपये ‘बीसी पॉईंट’च्या माध्यमातून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घरपोच विड्रॉलची सुविधा सुरू करणे गरजेचे आहे, असे मत अनेकांनी यावेळी व्यक्त केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Life in danger for five hundred rupees in charity, nanded news