प्रवास पद्मश्री डॉ. गंगाधर पानतावणे यांचा...

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 मार्च 2018

पद्मश्री डॉ. गंगाधर पानतावणे यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी पाचच्या सुमारास छावनी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

औरंगाबाद : दलित साहित्याचे अभ्यासक, पहिल्या विश्‍व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पद्मश्री डॉ. गंगाधर पानतावणे यांचे मंगळवारी (ता. 27 ) पहाटे दोनच्या सुमारास निधन झाले, ते 80 वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी पाचच्या सुमारास छावनी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 

'अस्मितादर्शकार' अशी ओळख असलेले डॉ. पानतावणे गेल्या 22 डिसेंबरपासून आजारी होते. त्यांच्यावर येथील माणिक रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, त्यांची प्रकृती उपचाराला दाद देत नसल्याने त्यांना सोमवारी (ता. 26) एम. आय. टी. रुग्णालयात पुढील उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. तेथेच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांना भारत सरकारतर्फे नुकताच पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. 

डॉ. पानतावणे यांचे पार्थिव नागसेनवन परिसरातील मिलिंद महाविद्यालयासमोरील त्यांच्या 'श्रावस्ती' या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. या ठिकाणी त्यांचे नातेवाईक, मित्र परिवार,साहित्यिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी दर्शनासाठी गर्दी केली. 

प्रवास पद्मश्री डॉ. गंगाधर विठोबाजी पानतावणे यांचा...

- जन्म : 28 जून 1937 (नागपूर)
- शालेय शिक्षण: डी.सी. मिशन स्कूल, नवयुग विद्यालय आणि पटवर्धन हायस्कूल, नागपूर
- महाविद्यालयीन शिक्षण : बी. ए., एम. ए. नागपूर महाविद्यालय
-  डॉक्‍टरेट : तत्कालीन मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद.
-  डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून विभागप्रमुख पदावरुन निवृत्त
- संपादक : अस्मितादर्श

-  ग्रंथनिर्मिती : मूल्यवेध, विद्रोहाचे पाणी पेटले आहे, मूकनायक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर, दलितांचे प्रबोधन, वादळांचे वंशज, प्रबोधनाच्या दिशा, पत्रकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, हलगी, चैत्य, दलित वैचारिक वाड्:मय, लेणी,

- साहित्य : प्रकृती आणि प्रवृत्ती, साहित्य : शोध व संवाद, स्मृतिशेष, अर्थ आणि अन्वयार्थ, आंबेडकरी जाणिवांची आत्मप्रत्ययी कविता, बुद्धचिंतन, विद्रोह, विज्ञान आणि विश्‍वात्मकता,

- साहित्यनिर्मिती : चर्चा आणि चिकित्सा, किल्ले पन्हाळा ते किल्ले विशाळगड.

- संपादित ग्रंथ : दलित आत्मकथन, दलित कथा, विचारयुगाचे प्रणेते : डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकचवळवळीचे प्रणेते : महात्मा ज्योतिबा फुले, महाराजांचा सांस्कृतिक इतिहास, लोकरंग, स्त्री आत्मकथन, धम्मचर्चा, दलित साहित्य : चर्चा आणि चिंतन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवडक लेख, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभिवादन ग्रंथ, भ्रांत निभ्रांत, महाराष्ट्र शासनाच्या राज्य मराठी विकास संस्थेतर्फे काढण्यात आलेला दलित ग्रामीण साहित्य शब्दकोष.

- ग्रंथ पुरस्कार : साहित्य : प्रकृती आणि प्रवृत्ती ग्रंथासाठी महाराष्ट्र राज्य ग्रंथ पुरस्कार, दलित साहित्य : चर्चा आणि चिंतन ग्रंथासाठी महाराष्ट्र राज्य ग्रंथ पुरस्कार, पुणे येथील महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार. दलितांचे प्रबोधन या ग्रंथासाठी महाराष्ट्र राज्य ग्रंथ पुरस्कार, चैत्यसाठी पुणे येथील महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार आणि अस्मितादर्शला उत्कृष्ट विशेषांक पुरस्कार.

- विविध संस्थांवर प्रतिनिधित्व : महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, महाराष्ट्र राज्य प्रौढ शिक्षण नियामक मंडळ, महाराष्ट्र राज्य कला समिती, महाराष्ट्र शासनाचे संतपीठ, महाराष्ट्र राज्य हस्तलिखित समिती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समिती, मराठी शब्दकोष समिती, मराठी वाड:मय कोष समिती, ज्ञानकोषकार केतकर ग्रंथ प्रकाशन समिती, विद्वत परिषद महाराष्ट्र राज्य ग्रंथनिर्मिती व संशोधन मंडळ, महात्मा फुले प्रतिष्ठान डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, महाराष्ट्र साहित्य परिषद, मिलिंद साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य ग्रंथनिवड समिती, यशवंतराव चव्हाण ग्रंथ पुरस्कार समिती, महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार समिती, कर्मवीर भाउराव पाटील जन्मशताब्दी समिती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मशताब्दी समिती, विविध विद्यापीठातील अभ्यास मंडळे व संशोधन समित्या, पिपल्स एज्युकेशन सोसायटी, नॅशनल बुक ट्रस्ट, मराठवाडा साहित्य परिषद विश्‍वस्त, साहित्य अकादमी पुरस्कार समिती. 

- राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय बहुमान : नुकताच भारत सरकारने जाहीर केलेला पद्मश्री पुरस्कार , भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार लंडन (इंग्लंड), अमेरीकेतील सॅन होजे येथे झालेल्या पहिल्या विश्‍व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष , अखिल भारतीय दलित साहित्य अकादमीचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार, फाय फाउंडेशन राष्ट्रीय पुरस्कार, हूज हू एशिया, किर्लोस्कर जन्मशताब्दी पुरस्कार, स्वातंत्र्यसैनिक विनायकराव चारठाणकर पुरस्कार, फुले आंबेडकर स्मृति पुरस्कार, आचार्य अत्रे समीक्षा पुरस्कार, मराठवाडा लोकविकास मंच मुंबई पुरस्कृत मराठवाडा गौरव पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषदे पुणे पुरस्कृत डॉ. भालचंद्र फडके पुरस्कार, मूकनायक पुरस्कार, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ गौरववृत्ती, राजर्षि शाहू आरक्षण शताब्दी पुरस्कार, कैल. नानासाहेब नारळकर विद्वत संशोधन, पद्मश्री दया पवार साहित्य पुरस्कार, कुसूमताई चव्हाण साहित्य पुरस्कार, महर्षि विठ्ठल रामजी शिंदे पुरस्कार, राष्ट्रीय बंधूता पुरस्कार, डॉ. पंजाबराव देशमुख पुरस्कार, स्वामी रामानंद तिर्थ महाराष्ट्र भूषण पुरस्कार, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे साहित्य पुरस्कार, राम शेवाळकर आधारवड पुरस्कार, वसंतराव मून स्मृति पुरस्कार, प्रा. व. दि. कुलकर्णी साहित्य सन्मान, नागसेनवन मित्र परिवार सन्मान 

- शैक्षणिक व सांस्कृतिक कार्य : दलित शोषित व मागासवर्गीय स्त्रियांच्या उत्थानासाठी 1922 मध्ये नागपूर येथे स्थापन करण्यात आलेल्या श्री चोखामेळा समाज कन्या शाळेच्या कार्यकारिणीवर कार्य. दलित व बौद्धांनी मागासवर्गीय मुलांच्या शिक्षणासाठी चालवलेली महाराष्ट्रातील अग्रगण्य संस्था., डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतिकारी तत्वज्ञानातून उर्जाप्राप्त दलित साहित्य चळवळीचे मुखपत्र अस्मितादर्श या नियतकालिकाचे संपादक, बोधिसत्व प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lifes Journey of Padmashri Dr Gangadhar Pantavane